म्हणालेल्या एसटी वाहकाचा कोरोनाने मृत्यू
आगार व्यवस्थापकांवर कारवाईची मागणी : लेखी आश्वासन द्या, अन्यथा मृत्यदेहाचा अंत्यविधी नाही
औरंगाबाद : मुंबईला बेस्ट वाहतुकीसाठी पाठवू नका, माझी बायपास शस्रक्रिया झालेली आहे, अशी विनंती एका वाहकाने केली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून त्याला मुंबईला पाठविण्यात आले. तेथून परतल्यानंतर अवघ्या ९ व्या दिवशी या वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी औरंगाबादेत घडली.
रंजित चव्हाण असे या मृत वाहकाचे नाव आहे. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. रंजित चव्हाण हे मध्यवर्ती बसस्थानकात कार्यरत होते. त्यांनी मुंबई येथे १९ आणि २० फेब्रुवारी रोजी बेस्ट वाहतुकीसाठी कर्तव्य बजावले होते, परंतु त्यांनी त्यापूर्वी १८ जानेवारी रोजी विभाग नियंत्रक अरुण सिया यांना एका पत्राद्वारे अडचण सांगून सवलत देण्याची मागणी केली होती. त्यांनी माझे बायपास झालेले आहे आणि साखरही साडेतीनशेच्या वर असल्याचे नमूद केले. सोबत प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतही जोडली होती; परंतु त्यानंतरही आगार व्यवस्थापक सुनील शिंदे यांनी बेस्ट वाहतुकीसाठी कार्यमुक्त करीत मुंबईला पाठविल्याचे नातेवाइकांनी सांगितले. रंजित चव्हाण २१ फेब्रुवारी रोजी शहरात परतले. परंतु त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली नाही. दोन दिवसांच्या सुटीनंतर त्यांनी २४ ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक मार्गावर कर्तव्य बजावले. त्यानंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे ते कामावर गेले नाही. प्रकृती अधिक खालावल्याने सोमवारी मुकुंदवाडी परिसरातील रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्यांना कोरोनाचे निदान झाले.
मृत्यूनंतरही छळले
या प्रकाराने संतप्त झालेले एसटी कर्मचारी आणि नातेवाईक मंगळवारी रुग्णालयासमोर जमले. विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांनी नातेवाइकांशी चर्चा केली. मात्र, जोपर्यंत आगार व्यवस्थापक सुनील शिंदे यांच्यावर कारवाई होत नाही, गुन्हा दाखल होत नाही आणि रंजित चव्हाण यांच्या मुलाला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला. लेखी आश्वासन न मिळाल्याने सायंकाळपर्यंत मृतदेह रुग्णालयातच होता. मृत्यूनंतरही एसटी महामंडळ छळ करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. योग्य ती मदत आणि कारवाई झाली पाहिजे, असे अभिजित चंदेल (भाचा), पंकज पाशा म्हणाले. अंत्यविधीसाठी आलेले मनपाचे पथक चार तास थांबून परत गेले.
चौकशी करून कारवाई
नियमानुसार मदत केली जाते, ती केली जाईल. नातेवाइकांनी आगार व्यवस्थापकांवर कारवाईची मागणी केली आहे. आगार पातळीवरील निर्णयाचे अधिकार त्यांच्याकडे असतात. यासंदर्भात चौकशी करून रा. प. नियमानुसार कारवाई केली जाईल, असे विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले. सुनील शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्यात आला; परंतु त्यांनी फोन उचलला नाही.
फोटो ओळ...
एसटी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नातेवाईक आणि एसटी कर्मचारी.