औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत स. भु., केम्ब्रिज, नाथ व्हॅली, राजे शिवाजी संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली.गुरुवारी झालेल्या सामन्यांत नाथ व्हॅलीने रायन इंटरनॅशनल संघावर ४२ धावांनी, तर राजे शिवाजी संघाने ज्ञानदा विद्यालयावर ४७ धावांनी दणदणीत मात केली. सरस्वती भुवन प्रशालेने किड्स किंगडम संघाचा, तर केम्ब्रिजने रिव्हरडेल संघाचा पराभव केला. आज झालेल्या सामन्यांत कुणाल शिंदे, यज्ञेश बाजपेयी, मंदार कुलकर्णी, संकेत पाटील हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.आज झालेल्या पहिल्या सामन्यात रायन इंटरनॅशनल संघाविरुद्ध नाथ व्हॅलीने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ४ बाद ९१ धावा केल्या. त्यांच्याकडून यज्ञेश बाजपेयीने नाबाद ३४ धावा केल्या. सुजित जाजूने २६ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात रायन इंटरनॅशनल संघाला ३ बाद ४९ पर्यंत मजल मारता आली. त्यांच्याकडून यश गाडवे याने १८ धावा केल्या. नाथ व्हॅलीकडून यज्ञेश व आदित्य यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात राजे शिवाजी संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत २ बाद ११४ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून कुणाल शिंदे याने चौफेर टोलेबाजी करताना २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांची स्फोटक खेळी केली. तसेच यश घोडके याच्या साथीने सलामीसाठी ३६ चेंडूंत ७६ धावांची वादळी भागीदारी केली. यश घोडके याने १९ चेंडूंत २ षटकार व ५ चौकारांसह ३८ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात ज्ञानदा विद्यालयाचा संघ १० षटकांत ३ बाद ८१ पर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून अविनाश मुळे याने एकाकी झुंज देताना ३६ चेंडूंत एक षटकार व ५ चौकारांसह ४५ व शार्दुल पोहनेकर याने १७ धावा केल्या. राजा शिवाजी संघघकडून कुणाल शिंदेने २१ धावांत २ गडी बाद केले.तिसºया सामन्यात स. भु. संघाने किड्स किंगडम संघाला १० षटकांत ५ बाद ५७ धावांवर रोखले. किड्स किंगडमकडून सागर पवार याने २१ चेंडूंत ४ चौकारांसह २६ धावा केल्या. स.भु.कडून मंदार कुलकर्णीने १२ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात स. भु. संघाने विजयी लक्ष्य ५.४ षटकांत बिनबाद ६१ धावा केल्या. अनिश पुजारीने १६ चेंडूंत एक षटकार व २ चौकारांसह नाबाद २२ व आदित्य राजहंस याने ५ चौकारांसह नाबाद २७ धावा केल्या. चौथ्या सामन्यात केम्ब्रिजने रिव्हरडेलविरुद्ध ३ बाद ८६ धावा केल्या. संकेत पाटीलने एक षटकार व २ चौकारांसह ३० चेंडूंत ३७ आणि श्रीमय सोमाणी याने २४ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात रिव्हडेलचा १० षटकांत ७ बाद ८१ धावा केल्या. त्यांच्याकडून सिद्धार्थ कोळी याने एकाकी झुंज देताना २० चेंडूंत २ षटकार व ४ चौकारांसह ३८ धावा केल्या.
स. भु., राजे शिवाजी सेमीफायनलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:44 PM