औरंगाबाद : सिडकोतील हरितपट्ट्यामधील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकासोबत अरेरावी करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर दगड आडवे टाकून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट आणि त्याच्या कंत्राटदाराची न्यायालयाच्या आदेशाने हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता सिडको बसस्थानकाजवळील सारस्वत बँकेजवळ घडली.
सी. ए. सोमेश्वर दिनेश असावा आणि कंत्राटदार सोमीनाथ अण्णासाहेब खरात, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंटदरम्यानच्या हरितपट्ट्यातील अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. सिडको बसस्थानकाजवळ असावा यांच्या भूखंडावर कंत्राटदार सोमीनाथ खरात हे बांधकाम करीत आहेत. या बांधकामाचे साहित्य भूखंडासमोरील हरितपट्ट्यात टाकण्यात आले आहे. शिवाय हरितपट्ट्यात पत्र्याचे मोठे शेड ठोकण्यात आले आहे. हरितपट्ट्यातील झाडे तोडून त्या ठिकाणी काँक्रिटीकरणासाठी लागणाऱ्या सळ्यांचा सांगाडा तयार करण्यात येत आहे. जमिनीवर कॉलमही टाकण्यात आला आहे.
हे साहित्य काढून टाकण्यासाठी रविवारी मनपाचे इमारत निरीक्षक पंडित बाबूराव गवळी आणि अन्य अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तात तेथे गेले होते. असावा आणि खरात यांना त्यांनी हरितपट्ट्यातील बांधकाम साहित्य काढून घ्या, असे सांगितले. दोन्ही आरोपींनी या कारवाईला विरोध करून पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर दगड हातात घेऊ न ते आडवे झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इमारत निरीक्षक गवळी यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी असावा आणि खरात यांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.