औरंगाबाद : सीए संघटनेला अधिक मजबूत करून भविष्यात आणखी उपक्रम राबविण्यासाठी सर्व चार्टर्ड अकाउंटंटस्नी बेनिव्हल फंड (सीएबीएफ)मध्ये अधिक योगदान द्यावे, असे आवाहन सीए संघटनेच्या पश्चिम भारत विभागीय परिषदचे (डब्ल्यूआरआरसी) अध्यक्ष मनीष गादिया यांनी येथे केले.
सातारा परिसरातील आयसीएआय भवनला गुरुवारी पश्चिम विभागीय परिषद पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी अध्यक्ष मनीष गादिया यांनी संघटना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यावर भर दिला. प्रारंभी, स्थानिक सीए संघटनेचे अध्यक्ष पंकज सोनी व विकासा अध्यक्ष रूपाली बोथरा यांनी पश्चिम विभागीय परिषदेचे अध्यक्ष गादिया, उपाध्यक्ष द्रष्टी देसाई, सचिव अर्पिता काबरा, कोषाध्यक्ष जयेश काला, पश्चिम विभागीय परिषदेचे विकासाचे अध्यक्ष यशवंत कासार आणि आयसीएआयचे थेट कर समितीचे अध्यक्ष सी.व्ही. चितळे यांचा सत्कार केला.
ऑनलाइन मोडद्वारे पॉडकास्ट भागांचा पहिला पुढाकार घेण्यात आल्याबद्दल गादिया यांनी औरंगाबाद शाखेचे व विकासा समितीचे अभिनंदन केले. यावेळी देसाई यांनी संघटनेच्या कार्याची माहिती करून दिली, तसेच ‘महिला सशक्तीकरण व रोजगाराच्या संधी’ याविषयी संबोधित केले. यावेळी २०२१ मध्ये झालेल्या नवीन चार्टर्ड अकाउंटंटस्चा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास सीए उमेश शर्मा, तसेच संघटनेचे सचिव प्रवीण बांगड, कोषाध्यक्ष गणेश भालेराव, माजी अध्यक्ष रोहन आचलिया, गणेश शीलवंत यांची उपस्थिती होती.