औरंगाबाद: तब्बल ४० दिवसानंतर एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळ विस्ताराला आज मुहूर्त मिळाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्याच्या वाट्याला तीन मंत्रिपदे आली आहेत. शिंदे गटाकडून दोन आणि भाजपच्या एका आमदाराचा मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांना मंत्रिपद मिळणार आहे. धक्कादायक म्हणजे शिंदे गटातील आक्रमक चेहरा संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.
सोमवारी सकाळपासून राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याच्य दृष्टीने हालचाली सुरु झाल्या होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सायंकाळी नांदेड-हिंगोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळात कोण असेल हे रात्री उशिरा ठरेल असे सांगून नावांबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता. सोमवारी रात्री उशिरा मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सर्व आमदारांची बैठक झाली. यात मंत्रिमंडळातील आमदारांची नावे ठरली. दोन्ही कडून प्रत्येकी ९ जणांचा आज शपथविधी होत आहे. यात औरंगाबाद जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. शिंदे गटातील पैठणचे आमदार संदीपान भुमरे, सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि भाजचे औरंगाबाद पूर्वचे अतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. भुमरे आणि सत्तार उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते. तर सावे हे देखील फडणवीस सरकारमध्ये शेवटच्या कार्यकाळात मंत्री होते.
धक्कदायक म्हणजे, मंत्रिमंडळ विस्तारत शिंदे गटाचा आक्रमक चेहरा औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा समावेश नाही. यामुळे शिरसाट नाराज असल्याची देखील चर्चा आहे. मात्र, पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळी शिरसाट यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. तर सोमवारी दिवसभर आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे टीईटी घोटाळ्यात आल्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, सर्व शंका दूर करत सत्तार यांचा समावेश झाला. विशेष म्हणजे, आज शपथ घेणारे १८ मंत्री हे सर्व कॅबिनेट मंत्री असणार आहेत. तसेच १८ पैक्की एकही महिला मंत्री नाही.