औरंगाबाद : मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात होणारी आणि गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू असलेली मंत्रिमंडळ बैठक गुंडाळल्यात जमा आहे. ११ डिसेंबरपासून नागपूरला राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून त्याचीच तयारी सध्या सुरु झाली आहे. यामुळे आता औरंगाबादला मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता जवळपास मावळल्यात जमा आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दिवाळीपूर्वी होण्याची तयारी झाली मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही बैठक नोव्हेंबर महिन्यात होईल, अशी शक्यता होती. मात्र बैठकीबाबत विभागीय आयुक्तालयाला वरिष्ठ पातळीवरून अजून काहीही सूचना आलेल्या नाहीत, त्यामुळे बैठक बारगळल्यात जमा असल्याचे राजकीय आणि अधिकारी वर्तुळात सांगितले जात आहे.
गेल्या वर्षी १ ते ४ आॅक्टोबरदरम्यान बैठक झाली होती. यंदाचा आॅक्टोबर सरला, नोव्हेंबर सुरू झाला आहे. ११ डिसेंबरपासून सुरू होणाºया हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरूझाल्यामुळे बैठक होणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकाºयांना अनुशेष, नवीन योजना, मागील वर्षाचे अनुपालन, अनुदान, प्रशासकीय मान्यता, प्रलंबित प्रकरणांबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी सप्टेंबरमध्ये दिले होते. मागच्या बैठकीतील निर्णय आणि त्याचे अनुपालन झाले काय, निधी किती आला, मराठवाड्याला गेल्या वेळी झालेल्या घोषणा आणि त्यातून किती प्रमाणात कामे झाली, याचा निश्चित आकडा अद्याप समोर आलेला नाही.
युतीमध्ये नाही ताळमेळ स्थानिक पातळीवरून आणि विभागातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीसाठी मागणी केली तर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ बैठक होऊ शकेल; परंतु भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांकडून त्याबाबत दबाव आणला जावा, अशी मागणी विरोधकांची आहे.
बैठकीच्या निमित्ताने किमान विभागासाठी गेल्या वर्षी केलेल्या घोषणा, निधीबाबत उजळणी तरी होईल; परंतु मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईतूनच काही हालचाली होताना दिसत नाहीत. मुंबईतील राजकारणामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ शिवसेनेच्या मंत्र्यांवर आलेली आहे, तर भाजपचे मंत्री बैठक घेण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवीत आहेत.
लोकप्रतिनिधी काय म्हणतात?
मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांनाच विचारावे लागेल. - रामदास कदम, पालकमंत्री,
औरंगाबाद मराठवाड्यातील कामांबाबत बैठक घ्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. -अर्जुन खोतकर, पालकमंत्री, नांदेड
मुख्यमंत्री बोलतील, तेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होईल. आम्ही बैठकीला येऊ. - दिवाकर रावते, पालकमंत्री, परभणी
बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारावे लागेल. व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे ते मागील वर्षी घोषित केलेल्या कामांचा आढावा घेत आहेत. - हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष
मराठवाड्याबाबत शिवसेना-भाजपला काहीही आस्था नाही. यंदा बैठक होईल की नाही, याची शाश्वती नाही. मागील वर्षांच्या कामांची अंमलबजावणी झालेली नाही. -अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस