लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातच २०१० पासून नैसर्गिक प्रसूती होण्यापेक्षा सिझेरियन शस्त्रक्रिया होऊन बाळ जन्मास येण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याची गंभीर बाब ‘बर्थ इंडिया’ संस्थेने निदर्शनास आणली आहे. याची गंभीर दखल घेत केंद्राच्या महिला व बालकल्याण विभाग व आरोग्य मंत्रालयाने ठोस पावले उचलली असून, कें द्राच्या आरोग्य योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयांना यापुढे रुग्णालयात नैसर्गिक व सिझेरियन प्रसूतीची आकडेवारी दाखविणारा फलक लावणे बंधनकारक असणार आहे.नैसर्गिक प्रसूतीची शक्यता असतानाही केवळ पैसे उकळण्यासाठी सिझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती केली, असा आरोप रुग्णांकडून डॉक्टरांवर अनेकदा छुप्या पद्धतीने केला जातो; परंतु वेळ अडलेली असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांच्या निर्णयावर कोणतीही आडकाठी न घेता सिझेरियन शस्त्रक्रियेला मंजुरी देतात. यामुळे डॉक्टरांचे खिसे तर भरतात; पण महिलांना मात्र आयुष्यभर वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावे लागते. प्रसूतीदरम्यान अचानक रुग्णाच्या प्रकृतीमध्ये होणारे बदल किंवा बाळाच्या हालचाली यासारख्या गोष्टी लक्षात घेऊन एकूण प्रसूतींच्या १० ते १५ टक्के प्रसूती सिझेरियन झाल्यास त्यात वावगे नाही. मात्र, आता खाजगी रुग्णालयांमध्ये या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.मागच्या वर्षी शहरात खाजगी दवाखान्यांमध्ये एकूण ५९ हजार प्रसुती झाल्या. यावर्षी जूनअखेरपर्यंत २३,९00 प्रसुती झाल्या. पण यापैकी नैसर्गिक व सिझेरियन प्रसुती किती, याची आकडेवारी खाजगी रुग्णालयांकडून दिली जात नाही. शासन दरबारी कुठेही याचे रेकॉर्ड नाही, मग यावर नियंत्रण ठेवणार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो. याला कुठेतरी आळा बसावा यासाठी, खाजगी रुग्णालयांना यापुढे नैसर्गिक व सिझेरियन प्रसूतीच्या आकडेवारीचा फलक रुग्णालयात लावावा लागणार आहे.
सिझेरियन व नैसर्गिक प्रसूतीचा फलक रुग्णालयाबाहेर लावणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:43 AM