औरंगाबाद : मिटमिटा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क करण्यासाठी अतिरिक्त जमिनीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्यानंतर गुरुवारी मनपा, भूमिअभिलेख विभागाच्या पथकाने मोजणी केली.
सफारी पार्कसाठी अतिरिक्त ५८ हेक्टर म्हणजेच १४५ एकर जमीन मिळविण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांसमक्ष मोजणी करण्यात आली. या मोजणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात येणार आहे.
पार्कमध्ये प्राण्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा, निवासस्थान, पर्यटकांना पाहताना फिरण्यासाठी लागणारी जागा याचा विचार केल्यानंतर जास्तीची जागा लागेल, त्या अनुषंगाने पालिकेने मागणी केली. त्यानुसार मिटमिट्यातील गट नंबर ३०७ मधील १७ हेक्टर आणि गट नंबर ५६ मधील ४१ हेक्टर जमिनीची मोजणी केली. मोजणीच्या अंतिम नकाशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव तयार करून शासनाला देईल.
जागा अपुरी पडत असल्याने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सिध्दार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय हलविण्याची सूचना केल्यानुसार मनपाने जिल्हा प्रशासनाकडे जागा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. मिटमिटा येथील गट नंबर ३०७ मधील १०० एकर जमीन पालिकेला दिली. ती जागा ताब्यात घेऊन स्मार्ट सिटी योजनेतून सफारी पार्क उभारण्यासाठी जागेचे सपाटीकरण व संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे.