पिंपळदरी : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी हद्दीत बिबट्याने धुमाकूळ घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारच्या मध्यरात्री तीनच्या सुमारास पिंपळदरी शिवारातील शेतकरी संजय रामजी साळवे यांचा गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढविला. यात वासरू जागीच ठार झाले.
शेतकरी साळवे यांनी सांगितले की, आम्ही काही शेतकरी रात्रीच्या वेळेला पिकांना पाणी भरण्यासाठी शेतात जातो. नेहमीप्रमाणे आम्ही शेतात पोहचलो. तेव्हा गोठ्यात बांधलेल्या वासराचा आवाज आला नाही. तेव्हा पाहणी केली असता ते वासरू मेलेल्या अवस्थेत दिसले. तर गोठ्याच्या आजूबाजूला बिबट्यासारखा प्राणी जात असल्याचे दिसून आले. सर्व शेतकरी सोबत असल्याने आम्ही त्याला हिमतीने हाकलले. बिबट्याने पळ काढला. मात्र पुन्हा आमच्यावरही हल्ला होईल. या भितीने सर्व शेतकरी गावात आलो. या घटनेने पिंपळदरी शिवारातील शेतकऱ्यामध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे काही गावकऱ्यांनी फोनद्वारे तक्रार दिली आहे. या भागात त्वरित जाळे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
-----------------
वनविभागाचे कर्मचारी आले अन् निघून गेले
शुक्रवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी आले. त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खंडारे यांनी पंचनामा केला. त्यानंतर कर्मचारी आले आणि निघून गेले. लोकांनी केलेल्या तक्रार मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. पंचनामा करताना आजिनाथ गव्हाणे, कैलास साळवे, वनविभागाचे कर्मचारी फकीरा शेख, कैलास माहोर यांची उपस्थिती होती.