वाळूजमहानगर : एका लघु उद्योजकांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.१७) रात्री ८.०० वाजेच्या सुमारास साजापूरच्या बालाजीनगरात घडली. अज्ञात मारेकऱ्याने डोक्यात पाठीमागून गोळी झाडल्याने गोळी आरपार जाऊन लघु उद्योजक सचिन साहेबराव नरोडे (३५, रा. बालाजीनगर, साजापूर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वाळूज उद्योगनगरीत एकच खळबळ उडाली आहे.
सचिन साहेबराव नरोडे हे मूळचे गंगापूर तालुक्यातील शिल्लेगावचे असून, काही दिवसांपासून साजापूरच्या बालाजीनगरात आई शोभाबाई, वडील साहेबराव व मुलगी स्वारांजली (११) यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. लघु उद्योजक सचिन नरोडे यांचे वडगाव शिवारात एक छोटेसे युनिट असून, चार महिन्यांपासून उद्योग बंद आहे. रविवारी रात्री ८.०० वाजेच्या सुमारास सचिन नरोडे यांच्या मोबाइलवर अज्ञात इसमाने संपर्क करून त्यांना घराबाहेर बोलावून घेतले.
यानंतर घरापासून अवघ्या १०० फुट अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानावर साजापूर ग्रामपंचायतीकडून जलजीवन मिशनच्या काम सुरू असलेल्या ठिकाणी बोलावण्यात आले. मोकळ्या मैदानात येताच अंधारात दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्याने त्याच्याजवळ असलेल्या पिस्टलने नरोडे यांच्या डोक्यात पाठीमागून गोळी झाडली. गोळी आरपार गेल्याने ते हे क्षणार्धात जमिनीवर कोसळले. गोळीबार झाल्यानंतर मोठा आवाज झाल्याने या भागातील नागरिक घराबाहेर आले असता त्यांना सचिन नरोडे हे रक्ताच्या थारोळ्यात दिसले. घटनेनंतर अज्ञात मारेकरी फरार झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पाहणीगोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, संदीप शिंदे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून कॉलनीतील नागरिकाकडून घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान, रात्री उशिरा पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी श्वान पथकाकडून मारेकऱ्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
महिनाभरापूर्वी जाळली कारसचिन नरोडे यांची डस्टर कार महिन्याभरापूर्वी अज्ञात माथेफिरूने जाळली होती. वडगावातील उद्योगही त्यांनी काही दिवसांपूर्वी बंद केल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
चार संशयित ताब्यात
पोलिसांनी चार संशियतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नेमकी हत्या कशामुळे करण्यात आली याची माहिती घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून होते. नरोडे यांचा मोबाइलही पोलिसांनी ताब्यात घेतला असून,. त्यांना फोनवर संपर्क करून घराबाहेर बोलावणाऱ्या अज्ञाताचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले.
सकाळपासून वीज पुरवठा खंडितबालाजीनगरात घडना घडलेल्या परिसरात रविवारी सकाळपासून वीज पुरवठा खंडित असल्याची माहिती नागरिकांनी दिली. वीज पुरवठा नेमका कशामुळे खंडित करण्यात आला होता, याची माहिती मिळू शकली नाही.