औरंगाबाद : मृत्यूचा महामार्ग म्हणून मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या बीड बायपासवरून आता राजकीय गु-हाळ सुरू झाले आहे. या सगळ्या गु-हाळात बांधकाम विभागाने त्या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी तात्पुरता उपाय करून बोळवण करण्यास सुरुवात केली आहे.
त्या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण महत्त्वाचे आहे. जोपर्यंत चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर उपाय निघत नाही, तोपर्यंत त्या रस्त्यावरील अपघात कमी होणे शक्य नाही. ६ कि़मी.च्या अंतरात १२ वसाहतींकडे जाण्यासाठी बीड बायपासवरील दुभाजक फोडून वळणाची व्यवस्था करणे शक्य नाही. त्यासाठी उड्डाणपूल, भुयारीमार्ग, सर्व्हिस रोड, रुंदरीकरण करण्यापैकी एखाद्या पर्यायावर महापालिका, बांधकाम विभागाने तातडीने विचार करणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका, बांधकाम विभागाने काहीही निर्णय घेतला नसून तात्पुरती कामे करून वेळकाढू धोरण अवलंबिल्याचा आरोप सातारा-देवळाईतील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले, बीड बायपासबाबत बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासन कार्यवाही करीत आहे, त्या रस्त्याबाबत लवकरच निर्णय होईल.
बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले, विभागाने ५ ते ७ दिवसांत काम होईल, अशी तयारी केली आहे. साईडच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून तो भाग रस्त्याच्या लेव्हलवर आणला जाईल. साईनबोर्ड लावण्यात येणार आहेत. खड्डे भरण्यात येतील, तसेच गतिरोधक टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सिग्नलवरील वळण रस्ते सध्या करणे शक्य नाही, परंतु डांबरी गतिरोधक करण्यात येतील. रम्बल्स स्पीड ब्रेकर्स टाकले जातील.