महिनाभरात तब्बल ४७ नागरिक
दोघे बाधित : इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांची संख्या अधिक
औरंगाबाद : परदेश दौऱ्याहून परतणारा नागरिक सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरतो. विमानप्रवास, परदेशात पर्यटनस्थळे अशा अनेक गोष्टींची नातेवाईकांकडून विचारणा केली जाते. परंतु, कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे सध्या परदेश दौऱ्याहून परतलेल्या नागरिकांनी नातेवाईकांसह आरोग्य यंत्रणेची झोप उडविली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात महिनाभरात तब्बल ४७ नागरिक परदेशातून परतले आहेत.
ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराने (स्ट्रेन) आरोग्य यंत्रणेसमोर नवे संकट उभे राहिले आहे. हा विषाणू ७० पटीने वेगाने पसरत असल्याचे सांगितले जाते. त्यातून नागरिकांना कोरोनाची लागण अधिक वेगाने होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरात गेल्या काही दिवसांत ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची ‘आरटीपीसीआर’ पध्दतीने कोरोना तपासणी केली जात आहे. तपासणी झालेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत दोघे कोरोनाबाधित आढळून आले. हे दोन्ही बाधित रुग्ण नव्या विषाणूचे बाधित आहेत का, याची तपासणी करण्यासाठी त्यांचा स्वॅब पुणे येथील ‘एनआयव्ही’ला पाठविण्यात आला आहे.
विदेशातून आलेल्यांची संख्या -४७
पाॅझिटिव्ह निघालेले रुग्ण-२
कुठून आले? -किती प्रवासी आले? ?
युके-४२
युएसए- २
जर्मनी-२
बहरीन-१
आवश्यक ती खबरदारी
नवा विषाणू आढळेल्या देशांची विमानसेवा सध्या बंद आहे. जे प्रवासी आधीच शहरात दाखल झाले आहेत, त्यांची तपासणी केली जात आहे. मुंबईहून तपासणी होऊन आलेल्या प्रवाशांवरही २८ दिवस लक्ष ठेवले जाईल. आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
कोरोनामुळे ३ महिने विमानसेवा होती ठप्प
औरंगाबादेत थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्चपासून देशातंर्गत विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर तब्बल ३ महिन्यांनंतर १९ जूनपासून इंडिगोने दिल्लीसाठी विमानसेवा सुरू केली.
विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?
विदेशातून विशेषत: नवीन विषाणू आढळलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची मुंबई विमानतळासह अन्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी करून क्वारंन्टाईन करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र, ही तपासणी सुरू करण्यापूर्वीच परदेशातून शहरात परतलेल्या प्रवाशांची महापालिकेने विमानतळावरून माहिती मिळविली. परतलेले हे नागरिक सध्या कुठे आहेत याचा शोध घेण्यात आला आणि त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली.
फोटो ओळ..
विमानतळावर अशाप्रकारे प्रवाशांची तपासणी केली जाते.