औरंगाबाद : छावणी परिसरातील नागरिकांची संख्या सुमारे १६ हजारांवर पोहोचली आहे. त्या तुलनेत छावणी सामान्य रुग्णालयात केवळ ८ डॉक्टर कार्यरत आहेत. छावणी परिसरातील लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अपुरी पडत असल्याने रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यामुळे डॉक्टरांची संख्या आणि सोयीसुविधा वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
छावणी परिसरातील विविध भागांसह महापालिकेच्या पडेगाव, नंदनवन कॉलनी, मिटमिटा भागातून नागरिक छावणी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येतात. या ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, दंतचिकित्सक, कान, नाक व घसा रोगतज्ज्ञ, फिजिशियन,नेत्ररोग, बालरोगतज्ज्ञ नियुक्त आहेत. या ठिकाणी एकूण ८ डॉक्टर आहेत. तर परिचारिका तसेच अन्य कर्मचा-यांची संख्या १६ आहे. छावणी परिसरातील लोकसंख्येचा विचार करता ही संख्या अत्यंत अपुरी आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास उपचारासाठी तासन्तास ताटकळावे लागते. ३० खाटांचे रुग्णालय आहे. दररोज पाचशे रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात, तर आठवड्याला २५ प्रसूती होतात. डॉक्टरांच्या अपु-या संख्येमुळे नाईलाजाने घाटी रुग्णालय गाठण्याची वेळ अनेकदा ओढावत असल्याचे नागरिकांनी सांगितले. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी खाटांसह सोयी-सुविधा वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
छावणी सामान्य रुग्णालयातील परिस्थिती- बाह्यरुग्ण विभाग दररोज सुमारे ५०० रुग्ण- प्रसूती विभाग महिन्याला सुमारे २०० रुग्ण - डॉक्टर- ८- परिचारिका, कर्मचारी- १६