औरंगाबाद : जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे राज्यभरात अंधारातून प्रकाशाकडे हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद शाखेतर्फे या उपक्रमाची सुरुवात तापडिया नाट्यमंदिरात करण्यात आली. या कार्यक्रमास वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मौलाना महफूज उर रहमान यांच्या कुरआन पठनाने झाली. अब्दुल कय्युम यांनी मराठी भाषांतर केले. यानंतर नोशाद उसमान यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेश येथून आलेले मौलाना कलीम सिद्दिकी यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले की, ईश्वराने दिलेल्या मार्गदर्शक मूल्यानुसार जेवण जगण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिक प्रकाशमय होईल आणि सबंध मानवी जगाला त्याचा फायदा होईल. जमातचे शहरप्रमुख इंजिनिअर वाजेद कादरी म्हणले की, स्वतंत्रता, समता, बंधुत्व या सामाजिक नियमांवर आधारित आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रकाशमय मार्ग इस्लामने दिला. अध्यक्षीय भाषणात जामाते इस्लामी हिंदचे प्रदेश अध्यक्ष रिजवान उर रहेमान खान यांनी सांगितले की, जीवन अमूल्य आहे, मृत्यूची वेळही अनिश्चित आहे. या जीवनानंतर एक पारलौकिक जीवन आहे, ज्यात आपल्याला आपल्या स्वामी पुढे जाब द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायला हवे. उस्मानपुरा गुरुद्वारा येथील प्रमुख ग्रंथी खडकसिंग, संंत तुकाराम आश्रमचे निवृत्ती महाराज घोडके, आकोटचे सत्यपालजी महाराज, अभय पुत्र भदंत, मराठा सेवासंघाचे डॉ. रमेश पवार, जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रचे सचिव मुहम्मद समी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात डॉ. शादाबमुसा, डॉ. हसीब अहमद, डॉ. सलमान मुकरम, फैजान काजी, फहीमुनिस्सा आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. इमरान अहमद खान यांनी केले.