वाळूज महानगर : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतींनी मोहीम हाती घेतली. या परिसरातील नागरिकांकडे लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. निधीअभावी गावातील विकासकामे रखडत असल्यामुळे ग्रामपंचायतीने कर वसुली अभियान सुरू केले आहे.
वाळूज महानगर परिसरातील पाटोदा, वळदगाव, वडगाव-बजाजनगर, घाणेगाव, जोगेश्वरी, रांजणगाव, साजापूर-करोडी, वाळूज, नारायणपूर, पंढरपूर आदी गावांतील नागरिकांकडे पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती, साफसफाई आदींचा लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहेत. या मालमत्ता कराचा भरणा करावा, यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीनी मार्च महिन्यात गावा-गावांत थकबाकी वसुली मोहीम सुरूकेली आहे. या मोहिमेअंतर्गत मालमत्ताधारकांना नोटिसा बजावून थकबाकी वसूल केली जात आहेत.
बहुतांश मालमत्ताधारक ग्रामपंचायतीचा कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे गावातील विकासकामे रखडत चालली आहे. शासनाकडून विविध योजनांद्वारे मिळणारा निधी अपुरा पडत असल्यामुळे गावातील विकासकामे ठप्प पडत चालली आहे. ग्रामपंचायतीकडून नागरिकांना पिण्याचे पाणी, रस्ते, साफ-सफाई आदी विविध नागरी सुविधा पुरविण्यात येतात. मात्र, ग्रामपंचायतीचा कर भरण्यास नागरिक स्वारस्य दाखवीत नसल्यामुळे मूलभूत सुविधा पुरविताना ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. आता शासनाच्या वतीने मालमत्ता कराची वसुली न करणार्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकावर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. त्यामुळे या स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकार्यांनी पदाधिकार्यांना सोबत घेऊन मालमत्ता कराची वसुली सुरू केली आहे. या परिसरात कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्यामुळे वसुलीसाठी गेलेल्या पथकाला कुटुंबप्रमुख भेटत नसल्यामुळे वसुलीला मोठा विलंब लागत आहेत. त्यामुळे वसुली पथकाला एका एका खातेदाराकडे अनेकदा चकरा मारून वसुली करावी लागत आहे.
मार्च महिन्यात थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायतीनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे मालमत्ताधारकही काही प्रमाणात कर भरत असल्याचे रांजणगावचे ग्रामविकास अधिकारी एस. एन. रोहकले, घाणेगावचे ग्रामविकास अधिकारी बी. बी. गव्हाणे, वडगावचे ग्रामविकास अधिकारी हरीश आंधळे, पाटोदाचे ग्रामविकास अधिकारी आर. डी. चौधरी, पंढरपूरचे सरपंच शेख अख्तर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.लाखो रुपयांचा मालमत्ताकर थकीत
वाळूज ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ६११५ खातेदार असून, या मालमत्ताधारकांकडे ३५ लाख ४१ हजार १७५ रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. याशिवाय घरपट्टी, दिवाबत्ती व स्वच्छताकराची एकूण १ कोटी ६१ लाख ८६२ रुपये थकीत आहे. या थकीत मालमत्ता करापोटी ग्रामपंचायतीने आतापर्यंत जवळपास ७५ लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. पाटोदा-गंगापूर नेहरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत ७१२ खातेदार असून, या खातेदारांकडे १६ लाखांचा कर थकीत आहे. पंढरपूर ग्रामपंचायत अंतर्गत १ हजार ४०० खातेदार असून, या खातेदारांकडे जवळपास ६२ लाख रुपयांचा कर थकीत आहेत. घाणेगावात ३ हजार २०० खातेदार असून, त्यांच्याकडे असलेल्या ४० लाखांपैकी ३० लाखांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ९ हजार ९५ खातेदार असून, ३ कोटी ६६ लाख रुपये करापैकी ६० टक्के कराची वसुली करण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे. या खातेदारांकडे थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी परिसरातील ग्रामपंचायतींनी वसुली मोहीम सुरूकेली आहे.
संबंधित म्हणतात...वसुली मोहीम सुरूवाळूज ग्रामपंचायतीच्या वतीने थकीत कराच्या वसुलीसाठी मोहीम सुरूकेली आहे. या मोहिमेंतर्गत कराची वसुली केली जात असून, अनेक नागरिक वेगवेगळी कारणे सांगून कर भरण्यास टाळाटाळ करीत आहे. नागरिकांना कर भरल्यास ग्रामपंचायतीला सुविधा पुरविताना निधीची चणचण भासत नाही. मालमत्ताधारकांना थकीत कर भरण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.- एस.सी. लव्हाळे (ग्रामविकास अधिकारी, वाळूज)
विकासासाठी कर भरावडगाव- बजाजनगरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दोन्ही गावांत विविध नागरी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीने वसुली मोहीम सुरू केली आहे. विविध योजना व प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी कराच्या रकमेचा विनियोग केला जातो. या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नागरिकांनी थकीत कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.- महेश भोंडवे (सरपंच)