श्रीकृष्ण अंकुश -यावेळच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध एआयएमआयएम, अशी चुरशीची लढत होत आहे. महत्वाचे म्हणजे, येथे पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना, सामना रंगला आहे. AIMIMचे नेते खासदार इम्तियाज जलील, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे हे तीनही नेते तुल्यबळ असल्याचे मानले जात आहे. कोण जिंकेल? हे सांगणे कठीण आहे. एवढी अटीतटीची लढाई असतानाही, प्रचारात मात्र कुठल्याही पक्षाचा जोर बघायला मिळाला नाही. यातच, आज चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला. यामुळे आता 13 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी मतदारांना घराबाहेर काढण्यात कोण यशस्वी ठरणार आणि कुणाला फायदा होणार? हे बघण्यासारखे असेल.
रणरणत्या उन्हात लोकांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान -खरे तर, यावेळी कुठल्याही पक्षाच्या प्रचारात स्थानिक पातळीवर नेहमी प्रमाणे जोर दिसला नाही. नेहमी प्रमाणे गावा गावात प्रचारसभा दिसून आल्या नाही. गावा-गावांतून नेत्याच्या प्रचारासाठी भोंगे लावून फिरणारी वाहणे, संबंधित उमेदवार अथवा संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावातून रॅली काढत लोकांना मतदानाचे आवाहन केल्याचे, मतदारांना भेटल्याचे क्वचितच बघायला मिळाले. आज चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला आहे. 13 तारखेला मतदान होणार आहे. यासाठी, आता सध्या पडत असलेल्या रणरणत्या उन्हात, औरंगाबादच्या मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रांपर्यंत आणणे सर्वच पक्षांसमोरील मोठे आव्हान अहे.
यावर अवलंबून असणार 4 तारखेचा निकाल - सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. याचा परिणाम राज्यात आतापर्यंत झालेल्या मतदनावरही झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद मतदारसंघातील लोकांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यात कोण यशस्वी होणार? बुथ पातळीवरील कार्यकर्ते किती जोर लावणार? आणि त्यांनी जोर लावल्यानंतरही मताचे विभाजन लक्षात घेता, त्याचा फायदा कुणाला किती होणार? या दृष्टीने लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. कारण यावरच 4 तारखेचा निकाल अवलंबून असणार आहे.
गेल्यावेळी अशी होती औरंगाबाद मदारसंघाची स्थिती -गेल्या निवडणुकीत AIMIM चे इम्तियाज जलील यांनी, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा, भाजपसारखा मोठा पक्ष सोबत असतानाही पराभव केला होता. खैरे साधारणपणे साडेचार हजार मतांनी पराभूत झाले होते. आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. चंद्रकांत खैरे ठाकरे गटाकडून मैदानात आहेत. त्यांच्या पाठीशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. तर संदिपान भुमरे शिंदे गटाकडून मैदानात असून त्यांच्यासोबत भाजपची ताकद आहे. तसेच जलील यांच्यासोबत आता वंचित नाही, मात्र एकगठ्ठा मुस्लीम मतदान आहे. अशा प्रकारे औरंगाबाद लोकसभेची निवडणूक अटीतटीची असल्याने या तिनही पक्षांना मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उरलेल्या दोन दिवसांत मोठी ताकद लावावी लागणार आहे.