औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात आरटीपीसीआर मोबाईल प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेला रोज २ हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य आहे. परंतु त्यासाठी संशयित रुग्णांचे नमुने मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, आता ही प्रयोगशाळा महापालिका अथवा घाटीला देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच स्पाइस हेल्थच्या माध्यमातून ही आरटीपीसीआर मोबाईल प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर या प्रयोगशाळेचे काम सुरू झाले. प्रत्येक दिवशी कमीत कमी २ हजार चाचण्या होणे गरजेचे आहे. प्रयोगशाळेतर्फे करण्यात आलेल्या चाचण्यांची देयके राज्यस्तरावर अदा करण्यात येणार आहे. परंतु दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रोज चाचण्या होत नसल्याने आरोग्य यंत्रणेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. ग्रामीण भागातून, अन्य जिल्ह्यांतील संशयित रुग्णांचे नमुने आणली जात आहेत. परंतु तरीही रोज २ हजार तपासण्या होत नसल्याची स्थिती आहे. पाचशेच्या घरात तपासण्या होत आहेत.
मनपा अथवा घाटीला प्रयोगशाळा देऊ
ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयाकडून पुरेसे नमुने येत नाहीत. ही प्रयोगशाळा तीन महिन्यांसाठी राहणार आहे. दररोज जवळपास पाचशे तपासण्या होत आहेत. शिवाय प्रयोगशाळेच्या जागेत लिक्विड ऑक्सिजन टँक, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहे. त्यामुळे मनपा अथवा घाटीला ही प्रयोगशाळा हलविण्याचा विचार करीत आहोत.
- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा सामान्य रुग्णालय
-----
फोटो ओळ...
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील आरटीपीसीआर मोबाईल प्रयोगशाळा.