औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक सुरू आहे. पहिल्या टप्प्यात काही गटासाठी निवडणूक घेण्यात आली. त्या गटातही एका मतपत्रिकेत एका महिला उमेदवारासमोर मतदाराने ‘तुमची निवडणूक लढविण्याची लायकी नाही’ अशी कॉमेंट केली होती. यानंतर दुस-या टप्प्यात पदवीधर गटासाठी सोमवारी (दि. ४) मतदान झाले. यात पदवीधरांनी १० जागांसाठी मतदान केले. या मतांची मतमोजणी गुरुवारी (दि. ७) सकाळी दहावाजेपासून सुरू आहे. सुरुवातीला मतमोजणी केंद्रातील अधिकारी चार जिल्ह्यातील मतपत्रिकांचे एकत्रीकरण करत खुल्या आणि राखीव गटातील मतपत्रिका वेगवेगळ्या करत होते. या मतपत्रिका वेगळ्या करण्यास उशिर होत होता. सर्व उमेदवार आणि समर्थकांमध्ये याविषयी नाराजी वाढत होती. तेवढ्यात निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे यांनी घोषणा केली. मतपत्रिकेसोबत एका मतदाराने उमेदवारांकडून अपेक्षा व्यक्त केल्याची चिठ्ठी जोडली असल्याचे सांगितले.तसेच या मतदाराने उमेदवारांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्या अपेक्षा डॉ. सरवदे यांनी वाचून दाखवल्या. तेव्हा सर्वत्र हशा पिकला. मात्र या चिठ्ठीतील मतदाराने व्यक्त केलेल्या भावनेतून भीषण बेकारीचे वास्तव समोर आले आहे. अनेकांना नोकरी मिळत नसल्यामुळे लग्नसुद्धा जमत नसल्याचे सांगितले. यामुळे युवकांचे वय खूप पुढे गेले असल्याचे वास्तवही चिठ्ठीमध्ये मांडण्यात आले. ‘आज रोजी ग्रॅज्यूएट असलेल्या मुलगा उमेदवाराचे लग्न करताना कायमस्वरुपी नोकरी नसल्याने अडचणी येतातच. मुलगी म्हणजे जॉब सेक्युअर पाहिजे. हा मुद्दा निवडणुकीचा जरी नसला तरी जीवनाकरिता महत्त्वाचा आहे. अनेक लग्नाच्या मुला/मुलींची लग्ने न झाल्याने वय ३५/४० झाले आहे. तरी कायम व फिक्स पे का होईना जॉब मिळाला पाहिजे. अनेक इंजिनीअर्स, डॉक्टर्स, बीए, एमए, बीएस्सी, एमएस्सी, बीकॉम, एमकॉम बेकार आहेत. जॉब सेक्युलर नाहीत.
...बघा काही करता येते का ? बेरोजगार मतदाराची उमेदवाराला आर्त हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 10:18 PM