औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे शहरात अद्याप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही; परंतु गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर अवघड होऊ शकते. अशा वेळी स्मारके, पुतळे नव्हे, तर रुग्णालयेच कामी येतील. त्यामुळे प्रस्तावित स्मारके रद्द करून त्या निधीतून रेंगाळलेली रुग्णालये पूर्ण केली पाहिजेत, असे मत खा. इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
खा. जलील यांनी टष्ट्वीट करून स्मारकांना विरोध असल्याचे नमूद केले आहे. शहरातील दूध डेअरीच्या जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी सरकारने १११ कोटी ८९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक व आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली; परंतु प्रत्यक्षात पुढे काहीही झालेले नाही. त्याबरोबरच राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे घाटीत स्वतंत्र माता व बालसंगोपन विभाग (एमसीएच विंग) २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालसंगोपन विभाग उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. घाटी की दूध डेअरीची जागा, अशा घोळात या विभागाची उभारणी लांबत गेली. गेल्या दोन वर्षांपासून या दोन्हींचा केवळ कागदोपत्रीच खेळ सुरू आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नियोजित स्मारकासाठी निधीची तरतूद झाली आहे. दूध डेअरी येथील जागाही निश्चित झालेली आहे. तसेच शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्मारक उभारण्यात येणार आहे. सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्याने शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालयांची मदत घेतली जात आहे. अशा परिस्थितीत खा. इम्तियाज जलील यांनी स्मारकांना विरोधाची भूमिका घेतली आहे.
काय केले ट्वीटकोणत्याही नेत्याचे स्मारक यासारख्या वेळेस आपले रक्षण करणार नाही. रुग्णालये महत्त्वाचे ठरतील. म्हणूनच मी स्मारकांना विरोध करीत आहे आणि त्याऐवजी त्या निधीतून रुग्णालये तयार करण्यास सांगत आहे.
रुग्णालयांना नावे द्यावीतमहिला रुग्णालय आणि एमसीएच विंगसाठी पाठपुरावा करीत आहे. सध्याच्या परिस्थितीत स्मारके नव्हे, तर रुग्णालये कामी येतील. त्यामुळे गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक रद्द करून त्याचा निधी रुग्णालयांना दिला पाहिजे. या रुग्णालयांना त्यांची नावे देता येतील.- खा. इम्तियाज जलील