औरंगाबाद : पाणीपट्टीत एक रुपयाही वाढ करू नये, असे आदेश सर्वसाधारण सभेने दिलेले असतानाही मनपा प्रशासनाने तब्बल दहा टक्के वाढ केली. ४ हजार ४० रुपयांवरून नागरिकांना आता ४ हजार ४७७ रुपये भरावे लागत आहेत. वाढीव पाणीपट्टीचे आदेश त्वरित रद्द करा, असे आदेश शनिवारी सर्वसाधारण सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले.
समांतरच्या कंत्राटदारासाठी महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी नियमावली तयार केली होती. या नियमावलीला शासनाची मंजुरी घेतली होती. या नियमावलीनुसार प्रत्येक वर्षी पाणीपट्टीत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. समांतरच्या कंपनीची हकालपट्टी झाली असली, तरी नियमावली अद्याप जशास तशी आहे. त्यानुसार दरवर्षी पाणीपट्टीत दहा टक्के वाढ करण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे सर्वसाधारण सभेने ही दरवाढ रद्द करण्याचा ठराव सहा महिन्यांपूर्वी घेतला आहे. तरी यंदा प्रशासनाने पाणीपट्टी ४४७७ रुपये केली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. शनिवारी सर्वसाधारण सभेत महापौरांनी हा विषय उपस्थित केला.
सध्या शहरात पाणीटंचाई आहे. त्यात पाणीपट्टीत वाढ करणे योग्य नाही. यासंदर्भात आयुक्तांशी बोलणे झालेले आहे. त्यामुळे वाढीव पाणीपट्टी रद्द करण्यात येत आहे, असे शुद्धीपत्रक उद्याच प्रसिद्धीस देण्यात यावे, असे आदेश पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना महापौरांनी दिले. सर्वसाधारण सभेला अवघ्या ७ नगरसेवकांची उपस्थिती होती. गणपूर्तीअभावी महापौरांनी सभा आटोपती घेतली.