वाळूज महानगर : सिडको भाजीमंडईचे वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केले आहे, तरीही ग्रामपंचायतीकडून भाजीमंडईचा वापर केला जात नाही. त्यामुळे हा हस्तांतरणाचा करार सिडको प्रशासन रद्द करणार असल्याची माहिती सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी दिली.
सिडको वाळूज महानगरातील नागरिकांना जवळच स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळावा. या उद्देशाने प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून एलआयजी भागात भाजीमंडई उभारली; परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही भाजीमंडई अनेक वर्षांपासून धूळखात आहे. भाजीमंडईचा सिडकोकडून वापर होत नसल्याने सदर भाजीमंडई चालविण्यासाठी ग्रामपंचायतीला देण्यात यावी, अशी मागणी वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीने सिडको प्रशासनाकडे केली होती. मध्यंतरी सिडकोने ग्रामपंचायतीकडे भाजीमंडईचे हस्तांतरण केले. भाजीमंडई एका बाजूला असल्याने व लगतच सांडपाण्याचा नाला असल्याने भाजीमंडईत येण्यास भाजीपाला विक्रेत्यांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे ग्रामपंचायतीलाही भाजीमंडई सुरू करणे शक्य झाले नाही. नागरिकांमधून ओरड सुरू होताच प्रशासनाने भाजीमंडई सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ग्रामपंचायत सदरील भाजीमंडईचा काहीच वापर करीत नसल्याने सिडको प्रशासनाने केलेला हस्तांतरणाचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी दिली आहे.
सिडकोने भाजीमंडई सुरू करावीग्रामपंचायतीकडून भाजीमंडई सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत; परंतु विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. भाजीमंडईचा ग्रामपंचायतीकडे केलेला हस्तांतरणाचा करार सिडको रद्द करीत असले तर त्यांनी स्वत: भाजीमंडई सुरू करून नागरिकांना सेवा द्यावी, असे मत माजी सरपंच सुनील काळे यांनी व्यक्त केले.