औरंगाबाद : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने अनुदान घोषित करण्यासाठी विनाअनुदानित शाळा प्रस्तावांच्या तपासणीकरिता नेमलेली पथके रद्द करुन संचालनालयातील जाणकार अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यास शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अनुकूलता दर्शवली असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे व शिक्षक क्रांतीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी कळविले आहे.
अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच वर्ग तुकड्यांची तपासणी होऊन संबंधित याद्या शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालक व आयुक्त कार्यालयांकडून मंत्रालयात गेल्या होत्या. या याद्या घोषित होण्याच्या प्रतीक्षेत असताना शासनाने क्षुल्लक कारणांवरुन त्या याद्या परत संचालक कार्यालयात पाठवल्या. या याद्यांमधील त्रुटी दूर करुन त्या ३० मेपर्यंत शासनाकडे पाठविण्याच्या सूचना होत्या; परंतु तसे झाले नाही. त्यानंतर संचालक कार्यालयाने या शाळांच्या प्रस्तावांच्या तपासणीसाठी संबंधित विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची ८ पथके तैनात केली. मात्र, पथकातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजातून वेळ न मिळाल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच शाळा तपासणीसाठी दिलेला कालावधीही निघून गेला. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन सादर करुन अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या भावना लक्षात घेता शाळा तपासणीसाठी अधिक वेळ न घालवता लवकरात लवकर ती प्रक्रिया पार पाडावी. संचालक कार्यालयाकडे स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी आहेत. अनेक वर्षांपासून ते शाळा तपासणीचेच काम करतात. त्यांना राज्यातील सर्व शाळांची स्थिती माहिती आहे. त्यामुळे नेमलेली पथके रद्द करुन या जाणकार व अनुभवी अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून शाळा तपासून घ्याव्यात, या आशयाची मागणी केली. त्यास त्यांनी अनुकूलता दर्शविली आहे.