छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना पैठण विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांचा शनिवारी पहाटे राहत्या घरी अपघात झाला. यामुळे महायुतीच्या प्रचार मोहिमेला धक्का बसला असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले उमेदवार विलास भुमरे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला आहे. भुमरे यांनी आज रुग्णालयातून व्हिडिओ प्रदर्शित केला. या माध्यमातून त्यांनी अपघाताचे कारण सांगत मतदारांना भावनिक साद घातली आहे.
विलास भुमरे हे पाचोड येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी पहाटे गॅलरीमधून खाली पडले. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा डावा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून ते सध्या शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या काळात मतदारसंघात प्रचार यंत्रणेला धक्का बसला. दरम्यान, उमेदवार भुमरे यांचा रुग्णालयातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भुमरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून रुग्णालयामधूनच मतदारांशी संवाद साधला आहे. प्रचारासाठी नियमित सकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत व्यस्त असल्याने पुरेसी झोप मिळाली नाही. यामुळे भोवळ येऊन पडून अपघात झाल्याचे विलास भुमरे यांनी सांगितले.
काय म्हणाले विलास भुमरे''दोन दिवसांपूर्वी पाचोड येथील निवासस्थानी पहाटे गॅलरीमधून खाली पडल्यामुळे मी गंभीर जखमी झालो. सध्या मी सुखरूप आहे. मात्र, या काळात पैठण तालुक्यातील कार्यकर्ते, शिवसेना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मीच विलास भुमरे आहे असं समजून मतदारसंघात प्रचार सुरू ठेवला आहे, याबाबत मी त्यांचा आभारी आहे. आता मला निवडून देऊन सेवा करण्याची संधी द्यावी'', अशी भावनिक साद उमेदवार विलास भुमरे यांनी मतदारांना घातली आहे.