सुनील घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : पितृपक्षाचा धसका घेतल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज भरायला तयार नाही. त्यामुळे निवडणूक कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख २२ सप्टेंबर असून, पितृपक्ष बुधवारी (दि.२०) संपत आहे, तर गुरुवारी (दि.२१) घटस्थापना होणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी (दि.२२) येथील कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरपंच पदासाठी केवळ २, तर ग्रा.पं. सदस्यपदासाठी ८ अर्ज प्राप्त झाले आहेत.तालुक्यातील १० ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. यातून ९२ सदस्य व १० सरपंचपदाची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी २२ सप्टेंबर नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यासाठी शेवटची तारीख आहे. मात्र, पितृपक्ष सुरू असल्यामुळे उमेदवार अर्ज भरण्यास तयार नाही. आतापर्यंत एकूण १० अर्ज निवडणूक विभागात प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तालुक्यातील पळसगाव, शुलीभंजन, लोणी, चिंचोली, येसगाव, देवळाना बु., विरमगाव, दरेगाव, कानडगाव, पडळी या गावांमध्ये निवडणूक होणार आहे. सरपंचपदासाठी दरेगाव येथील जयश्री गणेश बोर्डे, तर चिंचोली येथे ज्ञानेश्वर दुधारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतर ग्रा.पं. सदस्यांसाठी ८ जणांनी उमेदवार अर्ज भरले आहेत.
पितृपक्षाचा धसका; अर्जच दाखल होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 1:04 AM