छत्रपती संभाजीनगर : राज्यातील मराठी माध्यमाचे विद्यार्थीही पुढील आदेशापर्यंत मराठी आणि ‘सेमी इंग्रजी’ माध्यमाच्या शाळेत सहशिक्षक पदावर नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम (प्रेफरन्स) देऊ शकतील, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रविंद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी शुक्रवारी (दि.९) दिला.
ज्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे, अशा उमेदवारांना सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सहशिक्षक पदावर नियुक्तीकरिता प्रथम प्राधान्य देण्याबाबतच्या शिक्षण आयुक्तांच्या पत्राला आव्हान देण्यात आले होते. १२ फेब्रुवारीपर्यंतच पसंतीक्रम देण्याची अंतिम मुदत आहे, याचा विचार करून खंडपीठाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. या याचिकेवर ११ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील शिक्षकांच्या भरतीच्या अनुषंगाने ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२’साठी (टीएआयटी) जाहिरातीद्वारे अर्ज मागविले होते. त्याअनुषंगाने याचिकाकर्ता संतोषकुमार आनंदराव मगर व इतर (रा. छत्रपती संभाजीनगर) या मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज केले होते.
दरम्यान, पुणे येथील शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी २८ जानेवारी २०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना पत्र पाठवून ज्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे, अशा उमेदवारांना सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सहशिक्षक पदावर नियक्तीकरिता प्रथम प्राधान्य देण्याबाबत कळविले होते. याचिकाकर्ते मराठी माध्यमातून शिकलेले असल्यामुळे त्यांना नियुक्तीकरिता सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा प्राधान्यक्रम देता येत नव्हता. म्हणून त्यांनी ॲड. केतन डी. पोटे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचे शिक्षण जरी मराठी माध्यमातून झाले असले तरी त्यांना गुणवत्तेनुसार मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता १ ली ते ५ वीच्या वर्गावर सहशिक्षक पदावर नियक्तीकरिता पसंतीक्रम देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. ॲड. पोटे यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी शासनातर्फे सहायक सरकारी वकील सुभाष तांबे आणि परीक्षा परिषदेतर्फे ॲड. अनुप निकम यांनी युक्तिवाद केला.
माध्यमनिहाय शिक्षक भरतीराज्यात मराठी माध्यमाच्या १८,३७३, इंग्रजी ९३१, उर्दू १८५०, हिंदी ४१०, गुजराती १२, कन्नड १८, तामीळ ८, बंगाली ४ आणि तेलगू माध्यमाच्या २ शिक्षकांची भरती होणार आहे.