औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागाची गट क संवर्गाच्या भरतीसाठी रविवारी परीक्षा (health department examination) देण्यासाठी उमेदवारांना अक्षरशः धावाधाव करावी लागली. गल्लीबोळात असलेले केंद्र शोधण्यात दमछाक करावी लागली.
कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागास १०० टक्के रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यास अनुसरुन आरोग्य विभागाचे भरती प्रक्रिया राबविण्यासाठी मे. न्यासा, कम्युनिकेशन यांची नेमणूक केलेली आहे. शासनाच्या परवानगी नूसार गट क मधील औरंगाबाद मंडळातील २२ संवर्गातील १६० रिक्त पदे भरण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्सास अनुसरुन ३० हजार ९०८ अर्ज प्राप्त झाले. परीक्षेसाठी नोडल अधिकरी म्हणून जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर वाकळे यांची निवड केलेली आहे. आज दोन सत्रामध्ये परीक्षा होत असून, त्यासाठी एकंदरीत ६३ शाळा परीक्षा केंद्र आहेत.
परीक्षा ही पारदर्शकपणे पार पाडण्याकरीता प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्हीडीओ शुटींग, पोलीस बंदोस्त, जॅमरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रावर थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर व सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.