छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील काही मतदारसंघातील उमेदवारांना स्वत:लाच मतदान करता आले नाही. त्यांनी निवडणूक लढविली एका मतदारसंघात आणि त्यांचे मतदान होते दुसऱ्या मतदारसंघात. त्यामुळे त्यांना स्वत:ला मतदान करता आले नाही. यात भाजप, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा समावेश असून त्यांची गोची झाल्याचे पाहायला मिळाले.
पूर्व मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अतुल सावे व कुटुंबीयांनी खडकेश्वर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. सावे हे पूर्व मतदारसंघातील उमेदवार असताना त्यांना स्वत:ला मतदान करता आले नाही. पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार राजू शिंदे यांना मसनतपूर येथील मतदान केंद्रावर मतदान करावे लागले. परंतु त्यांनी निवडणूक पश्चिम मतदारसंघात लढविली. गंगापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांना जवाहर कॉलनीतील मतदान केंद्रावर मतदान करावे लागले. मात्र त्यांनी निवडणूक गंगापूरमध्ये लढविली. एमआयएमचे पूर्व मतदारसंघातील उमेदवार इम्तियाज जलील यांना मध्य मतदारसंघात तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसरखान यांनादेखील मध्य मतदारसंघात मतदान करावे लागले. या दोन्ही उमेदवारांनी पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविली. सर्वांनी त्यांचे मतदान ज्या मतदारसंघात नाव नोंदणी होती तिथे-तिथे जाऊन केले, व आपल्या मतदानाचा हक्क बजावला.