संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यायची म्हटली की लसीकरण केंद्र गाठावे लागते, तासन्तास रांगेत उभे रहावे लागते. मात्र, जिल्ह्यात अशाही व्यक्ती आहेत, ज्यांना अपंगत्व, अपघात आणि आजारांमुळे बेडवरून उठताही येत नाही. पण लवकरच अशा व्यक्तींना घरीच लस मिळणार असून, त्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून जोरदार तयारी सुरू आहे.
जिल्ह्यात १ ते १७ वर्षे वयोगटवगळता सर्वांना कोरोना लढ्यात ढाल ठरणारी लस दिली जात आहे. परंतु १८ वर्षांवरील अनेक व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहात आहेत. कारण कोणी अपघातामुळे, कोणी आजारपणामुळे, कोणी वयोमानामुळे तर कोणी अपंगत्वामुळे अंथरुणाला खिळून आहेत. लसीकरणापासून दूर राहिले तर अशा व्यक्ती कोरोनासाठी हायरिस्क ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींना लसीकरणासाठी केंद्रावर घेऊ जाण्यासाठी नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागते. काहींनी ही कसरत पार पाडून लस घेतली आहे. परंतु अद्यापही शेकडो व्यक्ती लसीकरणापासून वंचित आहे. त्यामुळे अंथरुणावर खिळून असलेल्या व्यक्तींना घरी जाऊन लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी सुरू आहे. त्यासाठी जिल्हाभरात अशा व्यक्तींचे सर्वेक्षण केले जात आहे.
----
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस -७,८७,४४१
दुसरा डोस - २,७२,९६४
----
६०पेक्षा जास्त वयोगट
पहिला डोस- १,६९,४४२
दुसरा डोस- ७९,४८२
-----
मला लस कधी मिळणार?
घरपोच मिळावी लस
पहिला डोस घेण्यासाठी केंद्रावर जावे लागले. त्यासाठी बराच त्रास झाला. आता दुसरा डोस बाकी आहे. माझ्यासारख्या प्रत्येक दिव्यांगाला घरपोच लस मिळाली पाहिजे. आता किमान दुसरा डोस तरी घरी मिळावा.
-गोविंद वाघ, दिव्यांग
------
बीपी, शुगरचा त्रास
मला बीपी, शुगर आहे. कोरोनामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, अशी सूचना केली जाते. पण लस घेण्यासाठी केंद्रावर जावे लागते. परंतु तेथे गर्दी असते. शिवाय लसही मिळत नाही. त्यामुळे घरीच लस मिळाली पाहिजे.
- शेषराव जाधव, ज्येष्ठ नागरिक
---
हायरिस्कमध्ये कोण?
वृद्धत्व, अपंगत्व, पॅरालिसिस, अपघात आणि इतर आजारांमुळे अनेकजण अंथरुणाला खिळून आहेत. अशा व्यक्तींना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेकडून नियोजन सुरू आहे.
-------
सर्वेक्षण सुरू
हायरिस्क व्यक्तींना घरपोच लस देण्यास लवकरच सुरुवात होईल. अशा किती व्यक्ती आहेत, यासंदर्भात सध्या सर्वेक्षण केले जात आहे. तरुण असो की ज्येष्ठ अंथरुणाला खिळून असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाईल.
- डाॅ. रेखा भंडारे, जिल्हा लसीकरण अधिकारी