औरंगाबाद : येथील अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल क्षेत्राच्या कौशल्यामुळे हे शहर ‘टेक्नॉलॉजी हब’ होण्याची क्षमता आहे, असे मत ब्रिटिश उपउच्चायुक्त मुंबई आणि दक्षिण आशियाचे एचएम व्यापार आयुक्त क्रिस्पिन सिमोन यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
उपउच्चायुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत आणि ब्रिटनच्या व्यावसायिक संबंधांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये उद्योग आणि व्यापारात गुंतवणूक आणि टेक्नॉलॉजी हे महत्त्वाचे पैलू आहेत. सध्या भारतातील पाच मोठ्या कंपन्यांमध्ये ब्रिटनने गुंतवणूक केली आहे. त्यात प्रामुख्याने टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि टाटा या कंपन्यांचा समावेश आहे. टाटामध्ये सुमारे ५० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर भारतानेदेखील ब्रिटनमधील पाच मोठ्या उद्योगांत गुंतवणूक केली आहे.
औरंगाबादेतील अभियांत्रिकी आणि आॅटोमोबाईल क्षेत्राचा प्रभाव असल्याचे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्र शासन आणि ब्रिटनच्या सहयोगाने पुण्याला टेक्नॉलॉजी हब बनविण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्या शहराची निवडदेखील करण्यात आली आहे. यामध्ये बंगळुरूसह भारतातील काही शहरांचाही समावेश आहे. औरंगाबादमध्येदेखील टेक्नॉलॉजी हब बनण्याची क्षमता आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटन अनेक देशांशी आर्थिक संबंध नव्याने प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. विशेषत: दक्षिण आशियातील भारतात त्यांना सर्वाधिक ताकद हवी आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ब्रिटन कंपन्या मोठी भूमिका पार पाडू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय विद्यार्थ्यांना सुविधा देण्याचा मानस व्यक्त करताना सिमोन म्हणाले, ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मागील तीन वर्षांत सुमारे २० हजार भारतीय विद्यार्थ्यांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले. ब्रिटिश सरकारने भारतीय विद्यार्थ्यांसाठी विशेष स्कॉलरशिप कार्यक्र म हाती घेतला आहे.
पर्किन्स कंपनीला दिली भेटउपउच्चायुक्त क्रिस्पिन सिमोन यांनी शेंद्रा येथील पर्किन्स या कंपनीला शुक्रवारी भेट दिली. तेथील श्रम संस्कृती, कामकाजाची त्यांनी प्रशंसा केली. पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा तर औरंगाबाद शहरात दुसऱ्यांदा आल्याचे सिमोन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.