जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : लसीकरणासाठी डेटलाइन ठरली
औरंगाबाद : कोरोनाच्या लसीकरणाचा पहिला टप्पा येणाऱ्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी प्रशासनाने लसीकरणासाठी डेटलाइन ठरविली असून, दोन कोटी बारा लाख लसींचा साठा कोल्डस्टोअरेजमध्ये करता येईल, एवढी क्षमता प्रशासनाने शासकीय आणि खासगी यंत्रणेमार्फत तयार केल्याचा दावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी केला.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, लसीकरणाची मोहीम शासनाच्या आदेशानुसार केव्हाही सुरू होण्याची शक्यता आहे. शासनस्तरावरून रोज अपडेट घेतले जात आहे. खासगी संस्थांकडे लस साठवणूक करण्यासाठी कोल्डस्टोअरेजची क्षमता जाणून घेतली आहे. तसेच शासकीय यंत्रणेकडे ६ लाख लस साठवता येईल. दोन कोटी १२ लाख लस साठवणुकीच्या तुलनेत ५० टक्के क्षमता जरी जिल्ह्यातील यंत्रणेला उपलब्ध झाली तरी पुढील नियोजन करणे सोपे जाईल. एक कोटी सहा लाख लसींचा साठा आपल्या जिल्ह्यात असेल. कोल्ड स्टोरेज असलेल्या व्यवस्थापनाला दुरुस्तीच्या सूचना केल्या आहेत. तापमान, कॉम्प्रेसरसह वाहतूक करणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असावी, अशा सूचना केल्या आहेत.
चौकट...
लसीकरणाची डेटलाइन
४ जानेवारीपासून १० जानेवारीपर्यंत विविध टप्प्यांवर वेगवेगळे नियोजन टप्पे डेटलाइन म्हणून ठरविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, कोल्डचेनसाठी ४ जानेवारी रोजी निविदा निघतील. लसीकरण पथकासाठी ५ जानेवारी नियोजन केले जाईल. ८ जानेवारी रोजी खाजगी आरोग्य यंत्रणेचा डाटा अद्यावत केला जाईल. १० जानेवारी रोजी व्हॅक्सिन थ्रमिंग केले जाईल, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.