सिडकोचा निर्णय : सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाने उचलले पाऊलवाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात भीषण पाणीटंचाई सुरु असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातही पाणी पुरवठा सुरु केल्यानंतर काही नागरिक विद्युत मोटारी लावून पाणी घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. प्रशासनाने विद्युत मोटारी जप्ती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, पुढील आठवड्यापासून जप्ती मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे.
सिडको वाळूज महानगरातील नागरी वसाहतीचा विस्तार होत आहे. येथील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच एमआयडीसीने पाणी कपात केल्यान सिडको प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नागरिकांना आठ ते दहा दिवसातून एकदा तेही कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यातच काही नागरिकांकडून विद्युत मोटारी लावून पाणी घेतले जात आहे. या पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. हा प्रकार सिडकोतील एमआयजी, एलआयजी भागात अधिक आहे.
त्यामुळे सुरळीत व समान पाणीपुरवठा व्हावा यदृष्टीने सिडको प्रशासनाने पुढील आठवड्यापासून विद्युत मोटारी जप्ती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सिडकोचे उपअभियंता दिपक हिवाळे यांनी सांगितले.