गंगापुर (औरंगाबाद ) : औरंगाबाद- पुणे महामार्गावरील दहेगाव जवळील वीस नंबर खोलीजवळ गतिरोधकावर ट्रकचा वेग मंदावल्याने कार धडकून झालेल्या अपघातात गंगापूर येथील डॉक्टर अमोल वावरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले मुकुंद पाठे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.१४ ) अकरा वाजता घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉक्टर अमोल वावरे कामानिमित्त मुकुंद पाटील यांच्यासोबत औरंगाबाद येथे गेले होते. आपले काम आटोपल्यानंतर ते आपल्या कारमध्ये ( एम.एच.२० ई.जे.५००७ ) बसून गंगापूर च्या दिशेने निघाले होते. ११ वाज़ेदरम्यान दहेगाव जवळील वीस नंबर खोलीजवळ रस्त्यावरील गतिरोधकामुळे समोरील लोखंडी सळ्याने भरलेल्या ट्रकची कमी झालेली गती पाठीमागून येत असलेल्या डॉक्टर अमोल वावरे यांच्या लक्षात न आल्याने त्यांची कार ट्रकच्या पाठीमागून धडकली.
धडकेने कारच्या एअर बैग उघडल्या मात्र ट्रकचे फाळके डॉक्टर वावरे यांच्या कपाळाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत असलेले मुकुंद पाठे हे बालंबाल बचावले. पाठे यांनी जखमी अवस्थेत त्यांचे मित्र डॉ. आबासाहेब शिरसाठ यांना अपघातची कल्पना दिली. तोपर्यंत दहेगाव येथील गणेश राउत व त्यांच्या मित्रांनी अपघातस्थळी धाव घेतली व जीप तोडून वावरे आणि पाठे यांना जीप मधून बाहेर काढले. शिरसाठ यांनी तत्काळ जखमी पाठे यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
दरम्यान, सोमवारी सकाळी 11 वाजता शोकाकुल वातावरणात डॉ अमोल वावरे यांच्या पर्थिववार अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.