लासूर स्टेशन : येथील माजी उपसरपंच तथा कै. अंबादास व्यवहारे प्रतिष्ठानचे गणेश व्यवहारे व त्यांचे बंधू दिनेश व्यवहारे व योगेश व्यवहारे यांनी कोरोनामुळे रुग्णवाहिकेचा तुटवडा पडत असल्याने स्वत:च्या कारचे रूपांतर रुग्णवाहिकेत केले. याद्वारे तीन भावांनी मोफत रुग्णसेवा सुरू करून सामाजिक कार्याचा एक आदर्श निर्माण केला आहे.
लासूर स्टेशन येथील कै. अंबादास व्यवहारे हे परिसरात समाजसेवा करण्यात नेहमी अग्रेसह राहत होते. त्यांच्या मृत्यूनंतर हा वसा त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांच्या नावे सुरू केलेल्या प्रतिष्ठानद्वारे सुरू ठेवला आहे. या भावंडांमध्ये सर्वात मोठे असलेले गणेश व्यवहारे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राहिलेले आहेत. प्रतिष्ठानच्यावतीने या तिन्ही भावंडांनी गरीब रुग्णांना ने-आण करण्यासाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. मात्र, कोरोनामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांनी आपल्या वैयक्तिक कारचे रूपांतर रुग्णवाहिकेत केले. ते व त्यांचे दोन बंधू या दोन्ही वाहनांचे चालकत्व करतात. परिसरातील गावांमध्ये व्यवहारे बंधू रुग्णांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देतात. रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणे, निराधार वृद्ध रुग्णाची सर्व व्यवस्था करणे, पुन्हा घरी घेऊन जाणे, एखादा रुग्ण मयत झाल्यास त्यांना गावी घेऊन जाणे, आवश्यक ती सर्व मदत तिन्ही बंधू करीत आहेत. सध्या सर्वत्र कोरोना महामारीचा उद्रेक सुरू असताना जवळचे नातेदेखील दूर जात आहेत, अशा परिस्थितीत ही तिन्ही भावंडे मनापासून गोरगरिबांची रुग्णसेवा करीत असल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
चौकट
आजोबांपासून समाजसेवेचा वसा
गणेश, दिनेश व योगेश व्यवहारे यांचा समाजकार्याचा वसा त्यांच्या आजोबांपासून आहे. त्यांचे आजोबा कै. दादाभाऊ व्यवहारे यांनी १९७२च्या दुष्काळात ग्रामस्थांना अन्नधान्य वाटप केले होते. तर त्यांचे वडील कै. अंबादास व्यवहारे यांनीही अनेक गोरगरिबांना आजारात मदत करून तो वसा जपला. आता त्यांची तिन्ही मुले हे कार्य चालवित आहेत. जेवण सुरू असतानाही जर फोन आला, तर ते जेवण बाजूला करून रुग्णसेवेसाठी धावतात. आतापर्यंत त्यांनी ८० पेक्षा जास्त रुग्णांची मोफत ने-आण केली आहे. तसेच १२ शव वाहिले आहेत. याव्यतिरिक्त अनेक गरजू रुग्णांना त्यांनी अर्थिक मदत केली आहे.
फोटो : रुग्णवाहिकेसह कै. अंबादास व्यवहारे प्रतिष्ठानचे गणेश व्यवहारे व त्यांचे बंधू दिनेश व्यवहारे व योगेश व्यवहारे.
090521\rameshwar_img-20210509-wa0051_1.jpg
कै. अंबादास व्यवहारे प्रतिष्ठानचे गणेश व्यवहारे व त्यांचे बंधू दिनेश व्यवहारे व योगेश व्यवहारे