औरंगाबाद : आरोपीला पकडण्यासाठी शिवाजीनगर येथील भाजीमंडईत गेलेले एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील सहायक फाैजदार सीताराम केदारे यांच्या अंगावर कुख्यात गुंड शेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसुद (वय ३२, रा. विजयनगर चौक, गारखेडा) याने गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक फाैजदार सीताराम केदारे हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा बंदोबस्त झाल्यानंतर साध्या वेशात शुक्रवारी दुपारी दीड वाजता एका गुन्ह्यातील आरोपी सोहेल यास पकडण्यासाठी शिवाजीनगर येथील भाजी मंडी परिसरात गेले होते. तेथे आरोपीचा शोध घेत असताना स्कुटीवर (एम.एच.२०, ई.क्यू.१४६३) एक महिला बसली होती. त्यावेळी पांढऱ्या रंगाची स्काॅर्पिओ (एम.एच.२६, व्ही.०९०९) गाडी आली व गाडीच्या चालकाने रिव्हर्स घेऊन दुचाकीवर बसलेल्या महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा केदारे यांनी मोठ्याने ओरडून गाडी थांबविण्याची सूचना केली. चालकाने गाडी थांबविली. तो व सोबत एक महिलाही खाली उतरली. तो स्कुटीवरील महिलेला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास जात असताना सोबतच्या महिलेने त्याला अडविले.
त्याचवेळी सहायक फाैजदार केदारे यांनीही त्यास अडवले असता चालकाने त्यांचा गळा पकडला. त्याला पोलीस अधिकारी असल्याचे सांगितल्यानंतरही त्याने गळा न सोडताच शिवीगाळ केली. यानंतर तो स्कॉर्पिओ चालक कुख्यात गुंड टिप्या असल्याचे पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निसटला. स्कॉर्पिओ गाडीत बसून पळून जाताना त्याने केदारे यांच्या अंगावर गाडी घातली. तेव्हा त्यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी घेत स्वत:चा जीव वाचविला. तेव्हा टिप्याने त्यांना ‘मै तेरेको देख लुंगा’, अशी धमकी देत निघून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक एस. के. खटाणे करीत आहेत.
शेकडो लोक बघत राहिलेहा प्रकार भर भांजी मंडईत सुरू होता. तेव्हा उपस्थित गर्दीतील एकही व्यक्ती हा प्रकार सोडविण्यासाठी पुढे आला नाही, असेही केदारे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.