वाळूज महानगर : बजाजनगरात रविवारी रात्री भरधाव कारने हातगाडी चालकाला उडविल्याची घटना ताजी असताना सोमवारी पहाटे पुन्हा एका भरधाव कारने दोन वाहनांना ठोकर देऊन एका घरावर जाऊन आदळली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनाचे व घराचे नुकसान झाले आहे.
बजाजनगरात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेदरम्यान गणपती मंदिराकडून त्रिमूर्ती शाळेकडे जाणाऱ्या भरधाव कारने (एमएच-२० बीक्यू-७३७३) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अतुल तांबट (एमएच-२८ एएन-३००८) व दीपक कळसकर (एमएच-१२ जीएन-१२३५) यांच्या वाहनांना ठोकर दिली. त्यानंतर बाळासाहेब सुपेकर यांच्या घरावर जाऊन आदळली. यात घरासमोरील विद्युत डीपी, घराची संरक्षक भिंत व आतील स्नानगृह आणि शौचालय जमीनदोस्त झाले. डीपी तुटल्यामुळे १४ घरांचा वीजपुरवठा खंडित झाला.
नागरिकांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विद्युत डीपीत अडकलेली कार बाजूला काढली. पहाटेच्या वेळी रस्त्यावर कोणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.