वाळूज महानगर : जोगेश्वरीत घरासमोर उभी केलेली कार लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप शिवाजी उगले (रा. सुंदर कॉलनी, जोगेश्वरी) यांनी गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांची कार (एम.एच.२०, बी.डी.१४२७) लॉक करून घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास कारच्या सेन्सरचा आवाज आल्याने उगले हे झोपेतून उठून घराबाहेर आले असता, त्यांना कार गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर उगले यांनी परिसरात सर्वत्र कारचा शोध घेतला. मात्र, कार कुठेही न सापडल्याने त्यांनी कारचोरी झाल्याची तक्रार दिली आहे.
-----------------------------------
दुचाकीस्वाराचा मृत्यू; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा
वाळूज महानगर : भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या फरार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर वसंत चव्हाण (रा. ओमसाईनगर, रांजणगाव) हे ११ जुलै रोजी त्यांचा चुलत भाऊ एकनाथ चव्हाण यांच्यासोबत दुचाकीने (एम.एच.१९, डी.क्यू.११७२) तिसगाव परिसरात कामासाठी गेले होते. सायंकाळी कामावरून सुट्टी झाल्यानंतर सागर चव्हाण व एकनाथ चव्हाण हे दुचाकीने रांजणगावच्या दिशेने घरी चालले होते. या मार्गावरील साजापूरजवळच्या एका पेट्रोलपंपासमोर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सागर चव्हाण यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सागर चव्हाण यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, सागर चव्हाण यांची प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी त्यांना १४ जुलै रोजी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान १५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सागर चव्हाण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत सागर यांचे भाऊ संजय चव्हाण यांनी गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक राहुल निर्वळ हे करीत आहेत.