औरंगाबाद : ओमायक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शहरातील पहिली ते पाचवीच्या शाळा १ डिसेंबर नाही तर १० डिसेंबरनंतर सुरु होणार आहेत. १० डिसेंबरनंतर शहरातील कोरोना स्थिती पाहूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ही महापालिकेने कळवले आहे.
ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होण्यावर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, ओमायक्राॅनच्या भीतीमुळे शहरातील शाळा सुरु होण्यावर पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. आज शहरातील शाळा सुरु होण्यावर महापालिकेने निर्णय घेतला. महापालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण स्थिती आणि कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा येत्या १० डिसेंबरपर्यंत बंदच राहतील. तसेच त्यानंरही शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, शाळा सुरु झाल्याच तर चिमुकल्यांना शाळेत पूर्णवेळ मास्क लावणे, वारंवार हात धुणे, आंतर राखण्याच्या सवयी पालकांना लावाव्या लागणार आहेत. शिवाय, अद्याप स्कूलबससंदर्भात कोणताही निर्णय न झाल्याने पाल्यांची ने-आण कधी करायची याची चिंता पालकांना लागली आहे.