- कृष्णा नेमाने
शेंद्रा : शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरत असला तरी आजही अनेक शेतकरी योग्य नियोजनाद्वारे शेतमाल निर्यातीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. वरुड काजी येथील तरुण शेतकऱ्याने पॉली हाऊसच्या माध्यमातून उत्पादित केलेले औरंगाबादचे कारले आता अमेरिकेला निघाले आहेत. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
औरंगाबाद तालुक्यातील वरुड काजी येथील शेतकरी शेखर अगजीराव दांडगे हा पदवीधर असून, त्याने काही दिवसांपासून आपल्या शेतात निर्यातक्षम पीक उत्पादनाचा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याने आपल्या शेतात पॉली हाऊस उभारले असून, त्यात ५ एकरमध्ये टोमॅटो लावून सहा महिन्यांत जवळपास १७ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. आता या क्षेत्रात त्यांनी कारल्याची लागवड केली असून, त्यासाठी जवळपास २ लाख रुपयांचा खर्च आला. प्रति तोडणी ५ ते ६ टन कारले सध्या निघत असून, सर्व खर्च जाता ९ लाखांचा नफा होणार असल्याचा दावा शेखरने केला आहे.
अहमदनगर येथील एका निर्यातदार कंपनीशी त्याने करार केला आहे. याद्वारे त्याच्या शेतातील कारले अमेरिकेला पाठवले जात आहेत. त्यातून त्यांना २५ ते ३० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. शेतमाल निर्यात करण्यापूर्वी ४० अंश सेल्सिअस गरम पाण्यात धुऊन पॅकिंग करून माल विमानाने पाठवला जातो. दुष्काळी परिस्थिती असताना शेखरने पाण्याचे योग्य नियोजन करून दुष्काळावर मात केली आहे. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात या तरुण शेतकऱ्याचा आदर्श घेण्याची गरज आहे.
आपले निर्यातक्षम कारले अमेरिकेत विकले जात आहेत, याचा अभिमान वाटतो. इतर शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता दाखवून कमी जागेत पाण्याचे नियोजन करून उत्पन्न वाढवावे. यातून आपला व कुटुंबाचा आर्थिक विकास साधावा.- शेखर अगजीराव दांडगे, प्रगतिशील शेतकरी