जालना : जालना विधानसभा मतदार संघाचे आ. अर्जुन खोतकर यांना शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले आहे. मंत्रालयात शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध भागांत आतषबाजी करुन शिवसैनिकांनी आंनदोत्सव साजरा केला. भाजपा-शिवसेनेचे राज्यात दोन वर्षांपूर्वी सरकार आले. मंत्रिमंडळात समावेशासाठी शिवसेनेतर्फे निश्चित झालेल्या यादीत आ. खोतकर यांचे नावही होते. मात्र, अखेरच्या क्षणी हुलकावणी दिली. गत ३० वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले आ. खोतकर हे ेयापूर्वी युती सरकारच्या काळात वस्त्रोद्योग व पर्यटन, पाणी पुरवठा व स्वच्छता आणि माहिती व जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री राहिलेले आहेत. विधिमंडळात मराठवाड्यातील दुष्काळासह सिंचन, शेतकरी आत्महत्या आदी विषय त्यांनी अत्यंत पोटतिडकीने मांडले. त्यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह भावूक झाले होते. मराठवाड्याचा बुलंद आवाज अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. जानेवारी २०१५ पासून शिवसेनेच्या शिवजलक्रांती योजनेचे मराठवाडा प्रमुख असून, एप्रिल २०१५ पासून ते महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत. गत वर्षभरात शिवसेनेतर्फे विविध उपक्रम राबविले. त्याचीच दखल घेत पक्षश्रेष्ठींनी शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देऊन त्यांना आणि पर्यायाने जिल्ह्याला व मराठवाड्याला न्याय मिळाल्याची भावना शिवसैनिकांतून व्यक्त केली गेली. (जिल्हा प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ असल्यानेच आपण मंत्रीपदापर्यंत पोहोचू शकलो आहे. या पदाच्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करणार आहोत. - आ. अर्जुन खोतकर४ आ. खोतकर यांच्या मंत्रिपदाचा मराठवाड्यात संघटनेला याचा फायदा होईल. शेतकऱ्यांचा आवाज ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीला शिवसेनेने न्याय दिला आहे. त्यांच्या पदामुळे विकासास चालना मिळेल. - ए.जे.बोराडे, जिल्हाप्रमुख, जालना.आ. अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहेत. शिवसेनेने त्यांना न्याय दिला. त्यांच्यासारख्या अनुभवी व धडाडीच्या नेतृत्वाला संधी दिल्याने विभागात शिवसेना वाढीस लागेल. - भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख, जालना.