औरंगाबाद : बीड बायपासवर सकाळ आणि संध्याकाळी अवजड वाहनांना बंदी केल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. परिणामी ही बंदी यापुढेही कायम राहणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी जाहीर केले.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे विनिमय व नियमन करण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता, जिवीतास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये म्हणून औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवरील ट्रक, कंटेनर,हायवा, ट्रेलर वाहनास सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत प्रवेश बंदी राहील, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आदेशात म्हटले आहे.
बीड बायपास रोडवर रोड मार्किंग, लेन सेपरेशन, सिग्नल बसविणे, रस्त्याचे पंखे (शोल्डर्स) भरून घेणे, रस्त्यातील वाहतुकीस अडथळा करणारे विजेचे खांब काढून घेणे इत्यादी कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ, भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण, महापालिका या विभागांकडून अद्याप झालेले नाहीत. ही बंदी यापुढेही कायम राहणार असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. सातारा-देवळाईतील संघर्ष समितीने पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.