उदगीर : उदगीर येथील चौबारा भागात हिरव्यागार कैऱ्या फोडून त्याची विक्री करून या आंबट कैऱ्याच्या तुकड्यांतून लोणच्याची गोडी शोधत कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणारे युवक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. सर्वसामान्यांच्या ताटात लोणचे थोडे, पण जेवणाऱ्याला चव देणारे असते. लोणचे शब्द उच्चारतानाही सर्वसामान्यांच्या तोंडाला पाणी येते. पण खाताना मात्र आपण त्याच्या निर्मितीचा विचार करतो. परंतु, या लोणच्याच्या निर्मितीतून उदरनिर्वाह करणारे उदगीर शहरात अनेक युवक आहेत. एका कैरीसाठी एक रुपया ते तीन रुपयांपर्यंत प्रती नग फोडून त्यातून मिळालेल्या पैैशावर उदरनिर्वाह केला जातो. सर्वसामान्य कुटुंबात १००, १५० एवढ्या प्रमाणात आंब्याचे लोणचे केले जाते व या तरुणांच्या माध्यमातून तयार करून मिळणारे लोणचे जिल्हा-परजिल्ह्यातील नातलग, शिक्षणासाठी बाहेर असलेली मुले व इतर आपल्या मित्र परिवारांनाही दिले जाते. या रुचकर लोणच्यामुळे या काळात कैरीचेच नव्हे, तर तिखट, मीठ व मोहरीचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते, असे मत आंबा विक्री व फोड करणारे मुसाभाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. (वार्ताहर)
कैऱ्यांच्या फोडीत शोधली जीवनाची गोडी...
By admin | Published: June 12, 2014 12:50 AM