औरंगाबाद : केशव कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्याबाबत सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करता येत असल्यामुळे तेथे जाणे योग्य राहील, असे मत व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे यांनी याचिकाकर्त्याला सत्र न्यायालयात जाण्याची मुभा दिली.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांच्यासह इतर तिघांविरुद्ध कुलकर्णी यांचा संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी विनंती करणाऱ्या अर्जाच्या अनुषंगाने राहाता येथील न्यायालयात नोंदविण्यात आलेल्या दोन साक्षीदारांच्या साक्षी पुन्हा नोंदविण्याची विनंती करणारा अर्ज फेटाळण्यात आला होता. या आदेशाविरुद्ध दाखल याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.यासंदर्भात मूळ तक्रारदार बापू दिघे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार केशव कुलकर्णी हे प्रवरा कारखान्याचे कर्मचारी होते. त्यांना ७ एप्रिल २०१२ रोजी कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर बोलावले होते. त्यावेळी तेथे माजी मंत्री बाळासाहेब विखे आणि त्यांची दोन मुले राधाकृष्ण आणि राजेंद्र, तसेच त्यांचे बॉडीगार्ड नेहे आणि डुकरे होते. दुसºया दिवशी कुलकर्णी यांचा मृतदेह कॅनॉलमध्ये आढळला होता. त्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी विखे पाटील यांनी कुलकर्णी यांची शेतजमीन विकत घेतली होती.दिघे यांनी तहसीलदारांकडे कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूबाबतची माहिती मागीतली. ती देण्यास त्यांनी आधी होकार देऊन नंतर माहिती दिली नाही. कुलकर्णी यांचे शवविच्छेदन प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात झाले होते. या संशयास्पद घटनांमुळे दिघे यांनी २०१६ साली राहाता येथील न्यायालयात खाजगी तक्रार दाखल करून फौजदारी प्रक्रियेच्या कलम १५६(३) नुसार राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील यांच्यासह इतर तिघांविरुद्ध कुलकर्णी यांचा संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी विनंती केली होती. मात्र, सदर घटनेला चार वर्षे झाली असल्याने वरील आरोपांबाबत पुरावे देण्याचे न्यायालयाने सूचित केले. या अर्जाच्या अनुषंगाने वाहनचालक राजू इनामदार आणि ग्रामविकास अधिकारी कविता आहेर यांच्या साक्षी नोंदविताना टंकलेखकाने चुका केल्या आहेत. त्यांच्या साक्षी पुन्हा नोंदविण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्याविरुद्ध दिघे यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. प्रज्ञा तळेकर आणि अजिंक्य काळे यांनी बाजू मांडली.
केशव कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करण्याची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:15 PM
केशव कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्याबाबत सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करता येत असल्यामुळे तेथे जाणे योग्य राहील, असे मत व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे यांनी याचिकाकर्त्याला सत्र न्यायालयात जाण्याची मुभा दिली.
ठळक मुद्दे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या विनंतीच्या अनुषंगाने आदेश