औरंगाबाद : आतापर्यंत शहरात १०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनामुळे मृत्यूचा दर ३ टक्के इतका आहे, तर शहरात ५.४ टक्के इतका असल्यामुळे केंद्रीय पथकाने मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूचा दर कमी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा, अशी सूचना पथकातील अधिकारी व राज्याचे प्रभारी कुणालकुमार यांनी केली. औरंगाबादची मुंबई होऊ देऊ नका, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणालकुमार, नागपूर एम्स रुग्णालयाचे अतिरिक्त प्रोफेसर डॉ. अरविंदसिंग कुशवाह, सहायक प्रोफेसर डॉ. सितिकांता बॅनर्जी यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करून त्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनी यासारख्या आजारांमुळे त्यांच्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले तरी ते लवकर कळत नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्याकरिता अशा ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, लवकरात लवकर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सोय करावी, जेणेकरून त्यांना वेळीच उपचार मिळतील, तसेच त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवण्यात यावे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संपर्कात राहून त्यांची वेळोवेळी माहिती घ्यावी, अशा सूचना कुणालकुमार यांनी मनपा आयुक्तांना केल्या. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ती वाढू शकते, ही शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली पाहिजे. विशेषकरून २० टक्के लोकांना आॅक्सिजनची गरज पडू शकते. त्याकरिता आॅक्सिजन बेड तयार ठेवा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांना करण्यात आली.
९ हजार रुग्णांच्या भरतीची व्यवस्थामहापालिकेने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आयुक्तांनी सादर केला. शहरातील घाटी, सिव्हिल, मनपा कोविड केअर सेंटर यासह खासगी रुग्णालयांत ८० टक्के बेड राखीव ठेवण्यात आले असून, ९ हजार रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासोबतच क्रिटिकेअर असलेल्या रुग्णांना आयसीयू, आॅक्सिजन, व्हेटिंलेटर असलेले ७५८ बेड तयार ठेवण्यात आले असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.