पैठण : गटविकास अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून मंगळवारी विष घेतलेले बिडकीन येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांचा गुरुवारी उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झाला. या घटनेने जिल्हाभरातील ग्रामसेवकांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान, ग्रामसेवक शिंदे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व दोन ग्रामसेवक मिळून चौघांजणाविरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिंदे यांच्या मृत्यूची वार्ता कळताच शेकडो ग्रामसेवकांनी बिडकीन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून संबंधीत घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. दरम्यान, दुपारी ग्रामसेवक शिंदे यांच्या पत्नी प्रतिभा शिंदे यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले की, माझे पती संजय शिंदे यांना विजय लोंढे (गटविकास अधिकारी), भास्कर त्रिंबक साळवे (विस्तार अधिकारी), सखाराम रामभाऊ दिवटे (ग्रामसेवक
पांगरा, तथा ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्ष, पैठण) व तुळशीराम वसंत पोतदार (ग्रामसेवक, चितेगाव) यांनी बिडकीन ग्रामपंचायतीचे कार्यालयीन रेकॉर्ड तपासणी करण्याच्या कारणावरून वारंवार मानसिक त्रास दिला आणि पाच लाख रुपयांची मागणी केल्याने माझ्या पतीला विषारी औषध पिवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. या फिर्यादीवरून चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत करणे व बेकायदेशीररित्या पैसे उकळण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी रात्री ग्रामसेवक शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बिडकीन गावातील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.