छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पैठणगेट येथील शाळेत चक्क बोगस विद्यार्थिसंख्या दाखविली. जुना बाजार येथील शाळेत प्रभारी मुख्याध्यापिकेने तर आपल्या वर्गावर डमी शिक्षिका नेमल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी दोन्ही मुख्याध्यापिकांना तडकाफडकी निलंबित केले. यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.
खंडपीठाने नेमलेल्या एका समितीने गुरुवारी महापालिकेच्या शाळांमध्ये अचानक तपासणी केली. पैठणगेट येथील शाळेत विद्यार्थिसंख्या कमी असताना गोषवाऱ्यात आणि गुरू ॲपमध्ये जास्त विद्यार्थिसंख्या दाखविण्यात आली. समितीने मोजणी केली असता विद्यार्थिसंख्या कमी असल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी मुख्याध्यापिका शाहीन फातेमा यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत, उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली. त्याचप्रमाणे जुना बाजार येथील शाळेत प्रभारी मुख्याध्यापिका शबाना फिरदोसी यांनी स्वत:च्या वर्गावर शिकविण्यासाठी एक डमी शिक्षिका नेमली. या शिक्षिकेचा पगार स्वत:तर्फे मुख्याध्यापिका देत होत्या. महिनाभरापासून डमी शिक्षिका काम करीत होती. न्यायालयाच्या समितीसमोरही हा प्रकार चव्हाट्यावर आला.
पाचजणांना नोटिसा
महापालिकेच्या शाळांमधील आणखी पाचजणांना गंभीर स्वरूपाच्या नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. त्यांचे उत्तर शनिवारी सकाळपर्यंत प्राप्त होईल. उत्तर समाधानकारक नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल.
६३ कोटींचा खर्चमहापालिकेच्या ६२ शाळांमध्ये १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील ५० शाळा डिजिटल, स्मार्ट करण्यासाठी प्रशासन तब्बल ६३ कोटी रुपये खर्च करीत आहे. काही शाळांचा कायापालट झाला. स्मार्ट शाळांमुळे यंदा विद्यार्थिसंख्येत वाढ झाली.
२७ लाखांचे गुरू ॲपविद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून प्रशासक जी. श्रीकांत यांनी तब्बल २७ लाख रुपये खर्च करून गुरू ॲप आणले. त्यावर गैरहजर विद्यार्थी कळतात, त्यांच्या पालकांना बोलून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत.
प्रशासनालाही धक्कामहापालिकेच्या शाळांमधील शिक्षक चुकीच्या गोष्टी करीत असतील, यावर प्रशासनाचाही विश्वास बसायला तयार नाही. प्रशासक जी. श्रीकांत यांनी प्रत्येक वेळी शिक्षक, मुख्याध्यापक यांचा योग्य सन्मानही केला. त्यानंतरही शाळांमध्ये असे प्रकार होतात, याचा प्रशासनालाही धक्का बसल्याचे सूत्रांनी सांगितले.