छत्रपती संभाजीनगर: शहरातील किराडपुरा परिसरात बुधवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या राडा प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी 400 ते 500 अज्ञात व्यक्तींवर शहरातील जिंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी मध्यरात्री दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या वादाचे रुपांतर काही वेळात तुफान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात झाली. बघताबघता किराडपुरा भागात तणाव निर्माण झाला. प्रसंगावधान राखत पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करत अश्रूधुराचे नळकांडे फोडत जमाव पांगवला. यावेळी पोलिसांना हवेत गोळीबार देखील करावा लागला. पहाटे चार वाजता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, जमावाने सरकारी 7 आणि खाजगी 6 अशा एकूण 13 गाड्या जाळल्या. यात 16 पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहेत. आज दुपारी या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात 400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या कलमाखाली गुन्हा दाखल 307, 353, 295, 332, 333, 143, 147, 148, 149, 153 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किराडपुरा भागात तणावपूर्ण शांतता किराडपुरा भागात श्रीराम मंदिर आहे. आज राम नवमी असल्याने या मंदिरात भाविकांसह अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. रमजान महिना आणि राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच शांततेचे आवाहन केले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.