औरंगाबाद : कथा चोरून त्यावर चित्रपट निर्माण केल्याच्या खाजगी तक्रारीच्या अनुषंगाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दखल घेतलेला (प्रोसेस इशू केलेला) चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या विरोधातील गुन्हा सत्र न्यायाधीश ए.डी. साळुंके यांनी रद्द केला.
शहरातील कथा लेखक मुश्ताक मोहसीन मुबारक हुसैन सिद्दीकी यांनी १९८३ मध्ये ‘श्रीमती’ या नावाने एक चित्रपट कथा लिहिली होती. या कथेचे त्यांनी फिल्म रायटर असोसिएशनमध्ये रजिस्ट्रेशन केले होते. दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना त्यांनी ही कथा सांगितलेली होती. त्यावर चित्रपटही होणे अपेक्षित होते. मात्र, २० जुलै २००९ मध्ये त्यांनी शहरातील चित्रपटगृहात ‘पेइंग गेस्ट’ हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा चित्रपट ‘श्रीमती’ची कथा चोरून केलेला आहे. मुश्ताक मोहसीन यांनी न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली. प्राथमिक सुनावणी होऊन त्यात ‘पेइंग गेस्ट’चे निर्माते- दिग्दर्शक सुभाष घई यांच्या विरोधात प्रोसेस इशू करण्याचे आदेश देण्यात आले होते.
११ एप्रिल रोजी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान अॅड. सागर लड्डा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मुश्ताक यांनी जरी ८ नोव्हेंबर १९८३ रोजी फिल्म रायटर असोसिएशनकडे रजिस्ट्रेशन केले असले तरी, कॉपी राईट अॅक्टखाली त्यांच्या कथेची कुठेही नोंद केलेली नाही, तसेच कथा नोंद केल्याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत आणि कॉपी राईट अॅक्टखाली गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्या अॅक्टनुसार कथेची नोंद असणे आवश्यक असल्याचे अधिकृत प्रमाणपत्रही नाही. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मुश्ताक यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, तसेच संबंधित कथा ही मुश्ताक यांची असल्याचे ते सिद्ध करू शकत नाहीत. याउलट ही कथा प्रकाश मेहरा फिल्म रायटर यांच्याकडून कराराद्वारे विकत घेतली. त्यामुळे मुश्ताक यांचे म्हणणे ग्राह्य धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला.