बीड : अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने मंगळवारी बीड शहरात प्रतिबंधित अन्नपदार्थ विरोधी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ९ पानटपऱ्यांवर गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी, तंबाखू आढळून आला. त्यांच्या विरुद्ध तीन ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बसस्टँडसमोरील गणेश उडपी पान सेंटर, बशीरगंज येथील तारा पान सेंटर, सना पान सेंटर, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समधील राम पान सेंटर, अण्णाभाऊ साठे चौकातील न्यू तारा पान शॉप, स्टेडियम कॉम्प्लेक्समधील प्रांजल पान सेंटर, पांगरी रोड येथील अंबिका पान सेंटर, जालना रोडवरील अश्विनी पान सेंटर व बस स्टँडसमोरील नंदलाल पान सेंटर या टपऱ्यांची तपासणी करून चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले.प्रतिबंधित अन्नपदार्थ विरुद्ध मोहीम राबविण्यासाठी उस्मानाबादचे सहायक पी.सी. बोराळकर, जालना येथील राम भरकड, औरंगाबाद येथील गजानन गोरे, राम मुंडे, उस्मानाबाद येथील दयानंद पाटील, या सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. बीडचे सहायक आयुक्त अनिल राठोड व अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांचाही पथकात समावेश होता. याशिवाय ८ पोलीस कर्मचारी, १० स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, आदित्य दंत महाविद्यालयाचे १० विद्यार्थी या सर्वांनी कारवाईच्या वेळी जमलेल्या नागरिकांना तंबाखू, गुटखा, पानमसाला यांच्या घातक परिणामांबद्दल माहिती दिली. तसेच १३ पानटपऱ्या व दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९ पानटपऱ्यांमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू यासारखे प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. ७१४६ रुपयांचा माल साठा जप्त करण्यात आला. ९ विक्रेत्यांवर शिवाजीनगर व बीड शहर ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही मोहीम अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या आदेशानुसार घेण्यात आली.मोहीम यशस्वी करण्यासाठी औरंगाबादचे सहआयुक्त सी.बी. पवार, उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
गुटखा विक्रीप्रकरणी नऊ टपरीचालकांवर गुन्हे दाखल
By admin | Published: February 16, 2016 11:43 PM