औरंगाबाद: पडेगाव भागातील एका खासगी कंपनीचे एटीएम फोडून चोरट्याने ८ लाख ११ हजार ९०० रुपये एवढी रोकड लंपास केली. ही घटना रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी छावणी ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिली.
श्रीकांत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 'हिताची पेमेंट सर्व्हिस चेन्नी' कंपनीमध्ये मागील दोन महिन्यांपासून ते व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कंपनीने पडेगाव भागात इंडस्इंड बँकचे एटीएम टाकलेले आहे. रविवारी सकाळी साडेसात वाजता कॅश लोडिंगचे काम करणारे मुकेश संघमती लखमल यांनी फोन करून पवार यांना बँकेचे एटीएम मशीन फोडलेले व अर्धवट जळाल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. त्यामध्ये रोकडही नसल्याची माहिती दिली.
पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली. चोरीच्यावेळी एटीएममध्ये असलेल्या पैशाचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. त्यानुसार १०० रुपयांच्या ४ नोटा, २०० रुपयांच्या १० नोटा, ५०० रुपयांच्या १ हजार ५९५ नोटा आणि २ हजार रुपयांच्या ६ नोटा होत्या. चोरट्याने एटीएम फोडून त्यातील ८ लाख ११ हजार ९०० रुपयांची रोकड लंपास केल्याचे स्पष्ट झाले. तपास निरीक्षक कैलाश देशमाने यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अंबादास मोरे करीत आहेत.
विनाकॅमेऱ्याचे एटीएम
हिताची कंपनीच्या इंडस्इंड बँकेच्या एटीएममध्ये सीसीटीव्हीसुद्धा लावलेले नसल्याचे चोरीनंतर स्पष्ट झाले आहे. जे आहेत, ते सुद्धा बंद अवस्थेत पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांना परिसरातील सीसीटीव्हीचा आधार घ्यावा लागणार आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा एटीएममधील सीसीटीव्हीचा मुद्दा चर्चेत आला आहे. घटनास्थळी सहायक आयुक्त अशोक थोरात, निरीक्षक देशमाने, सपोनि. मनीषा हिवराळे आदींनी भेट दिली.