छत्रपती संभाजीनगर : सरकारी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना किमान दोन दिवस थांबावे लागत आहे. तर त्याच वेळी खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केल्यानंतर अवघ्या तास, दोन तासात रुग्णाला घरी जाता येत आहे. एका शस्त्रक्रियेसाठी सरकारी रुग्णालयात वेगळे नियम आणि खासगी रुग्णालयात वेगळे नियम पाहायला मिळत आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया कोठे करावी, असा प्रश्नही अनेक रुग्णांना पडतो.
मोतीबिंदू झाला, असे नेहमीच ऐकण्यात येते. उतारवयात मोतीबिंदूमुळे अनेकांच्या दृष्टीवर परिणाम होतो. वेळीच शस्त्रक्रिया केली नाही तर कायमचे अंधत्व येण्याची भीती असते. आजघडीला घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय मराठवाड्यासह लगतच्या भागातून गोरगरीब रुग्ण मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी येतात. घाटीत टाक्याच्या शस्त्रक्रियेबरोबर फेको मशीनद्वारे कमीत कमी छेद देऊन बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते. तर जिल्हा रुग्णालयात टाक्याची शस्त्रक्रिया होते. याठिकाणी फेको मशीनची प्रतीक्षा केली जात आहे. शहरातील बहुतांश खासगी नेत्र रुग्णालयात ‘फेकाे’ पद्धतीने शस्त्रक्रिया करून रुग्णाला तास, दोन तासात सुटी दिली जाते. तर घाटी रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात रुग्णाला किमान दोन दिवस ॲडमिट राहावे लागते. तिसऱ्या दिवस सुटी होते. शस्त्रक्रियेनंतर इन्फेक्शन होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील नेत्ररोगतज्ज्ञ - १४५दिवसभरात शस्त्रक्रिया- २००
फेको मशीनसाठी पाठपुरावाजिल्हा रुग्णालयाला फेको मशीन मिळावे, यासाठी प्रयत्न केला जात आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी रुग्णाला सुटी दिली जाते. रुग्णाच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे आहे. खासगी रुग्णालयात ‘डे केअर’ असते. त्यामुळे लवकर सुटी दिली जाते.- डाॅ. अर्चना भडीकर, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक
भरतीनंतर दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियाआवश्यक तपासण्या करून रुग्णाला भरती केले जाते आणि दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया केली जाते. रुग्ण शहरातील असेल तर शस्त्रक्रिया झाल्याच्या दिवशीच सुटी दिली जाते. इतर रुग्णांना तिसऱ्या दिवशी सुटी दिली जाते.- डाॅ. काशिनाथ चौधरी, नेत्ररोग विभागप्रमुख, घाटी
‘फेको’ पद्धतीमुळे शक्यरुग्णाला पूर्वी ॲडमीट ठेवावे लागत होते; परंतु, आता ‘फेको’ पद्धतीमुळे शस्त्रक्रियेनंतर एक, दोन तासानंतर रुग्णाला लगेच सुटी देता येते. रुग्णाला तत्काळ ‘नजर’देखील येते. पाच हजार रुपयांपासून ते ४५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो.- डॉ. अरुण अडचित्रे, अध्यक्ष, नेत्ररोगतज्ज्ञ संघटना